5G साठी 6 पट अधिक टॉवर, केबल लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 10:39 AM2022-08-03T10:39:42+5:302022-08-03T10:39:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला असला तरी ५ जी दूरसंचार सेवेसाठी ४ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला असला तरी ५ जी दूरसंचार सेवेसाठी ४ जी सेवेच्या तुलनेत ६ पट अधिक दूरसंचार टॉवर आणि फायबर-ऑप्टिक केबल लागतील, असे फिनोलेक्स केबल्स लिमिटेडचे कार्यकारी चेअरमन दीपक छाबरिया यांनी म्हटले आहे.
‘फिनोलेक्स केबल्स’ ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी केबल उत्पादक कंपनी आहे. छाबरिया यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ५ जी दूरसंचार सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात न्यायची असेल, तर आताच्यापेक्षा ६ पट अधिक पायाभूत सुविधांची गरज लागणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या दूरसंचार टॉवरपैकी केवळ ३० टक्के टाॅवर फायबर-ऑप्टिक केबलने जोडलेले आहेत. उरलेले टॉवर ४ जी सेवेसाठी सूक्ष्म लहरींवर चालतात. मात्र ५ जी सेवेसाठी प्रत्येक टॉवर फायबर-ऑप्टिक केबलने जोडलेला असणे आवश्यक आहे. टॉवरांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवावी लागणार आहे.
छाबरिया यांनी सांगितले की, ४ जी सेवा ज्या सूक्ष्म लहरींवर चालते, त्या लहरी अखंडित ५ जी सेवेसाठी विश्वसनीय नाहीत. विशेषत: वातावरणीय बदलांत या लहरी टिकत नाहीत. शहरांमध्ये फायबर केबलने जाेडलेल्या टॉवरचा रिंग रोड लागेल. यातील आणखी एक आव्हान असे की, प्रत्येक इंटरसेक्शनसाठी वेगळ्या केबल संचाची गरज लागणार आहे. आपली कंपनी हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज असल्याचेही छाबरिया यांनी म्हटले आहे.
५ जीमध्ये इंटरनेट स्पीड २० जीबीपीएस
४ जी सेवेच्या इंटरनेटची गती २ जीबीपीएस आहे. ५ जीमध्ये ते २० जीबीपीएस असेल. ५ जी सेवेत टॉवरचा आकार घटेल. मात्र, अखंडित सेवा देण्यासाठी टॉवरची संख्या ६ पट अधिक लागेल. ५ जी इंटरनेट सेवेमुळे चालकरहित कारच्या पायाभूत विकासाचा मार्ग मोकळा होईल. त्याचा मोठा फायदा देशाला होईल.
- दीपक छाबरिया,
कार्यकारी चेअरमन, फिनोलेक्स
केबल्स लिमिटेड