80 टक्के भारतीयांची होते ऑनलाइन छळवणूक, सर्वेक्षणातून झालं उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 06:19 PM2017-10-09T18:19:07+5:302017-10-09T20:19:08+5:30
ऑनलाइन छळाच्या घटना अनुभवणारा चाळीशीखालील वयोगटात सर्वाधिक आहे. या वयोगटातील व्यक्तींनी 65 टक्के ऑनलाइन अपशब्द आणि अपमान सोसले आहेत. तसेच,
मुंबई - 80 टक्के भारतीयांची ऑनलाइन छळवणूक होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. सिमेंटेकच्या नॉर्टननं याबद्दलचे एक सर्वेक्षण केलं आहे. आज त्यांनी त्याचा अहवाल सादर केला. त्यानुसार सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या भारतातील 10 पैकी 8 जणांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या ऑनलाइन छळवणुकीला सामोरे जावं लागलं आहे. ऑनलाइन छळाच्या घटना अनुभवणारा चाळीशीखालील वयोगटात सर्वाधिक आहे. या वयोगटातील व्यक्तींनी 65 टक्के ऑनलाइन अपशब्द आणि अपमान सोसले आहेत. तसेच, 87 टक्के अपंग किंवा मानसिक अस्वास्थ्य असणारे आणि 77 टक्के लठ्ठपणाची समस्या असणारे लोक यांनी ऑनलाइन अपशब्द आणि अपमान सहन केला आहे.
अपशब्द वापरणं, अपमान करणं (63 टक्के) आणि द्वेषपूर्ण गप्पा, अफवा (59 टक्के) या प्रकारची छळवणूक सर्वाधिक होतं असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. नको असलेली भांडणे, ट्रोलींग, चारित्र हनन, लैंगिक छळाची किंवा शारिरीक हिंसाचाराची सायबर धमकी, तसेच या अनुभवांचे परिणाम आदींबाबत देशातील स्थिती समजून घेणे हे नॉर्टनच्या अभ्यासाचा मुख्य उद्धेश आहे.
भारतातील ऑनलाइन छळाची पातळी अत्यंत चिंताजनक आहे. आमच्या ताज्या संशोधनानुसार, ऑनलाइन छळाचे अधिक गंभीर प्रकार दर्शवतात. जसे की, शारीरिक हिंसाचाराची धमकी (45टक्के), सायबर धमकी (44 टक्के) आणि सायबर पाठलाग (45 टक्के) असे प्रकार खूप अधिक असल्याचे सिमंटेकच्या नॉर्टनचे देशातील व्यवस्थापक रितेश चोप्रा म्हणाले.
भारतातील वाढती लोकसंख्या सोशल मीडिया आणि मोबाइल ऑप्लिकेशन्सवर अधिक काळ घालवित असताना ऑनलाइन वापरकर्त्यांनी नको असलेल्या संपर्कांपासून त्यांच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी मूलभूत काळजी घ्यावी, असेही रितेश म्हणाले. पुढे ते म्हणाले, सायबर धमकीच्या सुमारे ४० टक्के घटना आणि सायबर पाठलागाच्या सुमारे निम्म्या घटनांमध्ये हे करणारी व्यक्ती अनोळखी आहे, असे आणखी चिंताजनक आहे. अनेकांनी सांगितले की, त्यांना धमकाविणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, याची त्यांना काहीच कल्पना नाही.
ऑनलाइन छळाचे अनुभव
सर्वेक्षण दर्शविते की, पुरुष आणि महिला दोघांनाही ऑनलाइन छळाला सारखेच सामोरे जावे लागले आहे, मात्र चाळीशी खालील वयोगटातील पुरुषांना आणि अपंग व मानसिक अस्वास्थ्य असणाऱ्या व्यक्तींना अधिक गंभीर धमक्यांना तोंड द्यावे लागले आहे. 49टक्के पुरुष आणि 71 टक्के अपंग व मानसिक अस्वास्थ्य असणाऱ्यांना शारीरिक हिंसाचार, तसेच 50 टक्के पुरुष आणि 67 टक्के अपंग किंवा मानसिक अस्वास्थ्य व्यक्तींनी सायबरधमकीचा एकतरी अनुभव घेतला आहे. विभागनिहाय विचार करता शारीरिक हिंसाचाराच्या सर्वाधिक धमक्या किंवा सायबरधमक्या पीडितांनी मुंबई (51 टक्के), दिल्ली (47 टक्के) आणि हैदराबादमध्ये (46टक्के) नोंदविल्या आहेत.
ऑनलाइन छळाचे परिणाम
ऑनलाइन छळामुळे बहुतेकदा भावनिक प्रतिक्रिया उद्भवतात. 45 टक्के लोक सांगतात यामुळे त्यांना राग येतो, 41 टक्के लोकांची चिडचिड होते आणि 36 टक्के निराश होतात. तसेच चारपैकी एका महिलेने तिचा अनुभव भीतीदायक असल्याचेही सांगितले. ऑनलाइन छळामुळे लोकांच्या प्रत्यक्ष आयुष्यावरही परिणाम होतात. त्यामुळे 33 टक्के लोकांनी सोशल मीडियावर त्यांच्या व्यक्तिगततेच्या सेटिंग वाढविल्या आहेत. 28 टक्के लोकांनी सांगितले की, त्याचा त्यांच्या काम आणि अभ्यासावर परिणाम होतो, 27 टक्के लोकांनी सांगितले की, याचा मित्रांशी असलेल्या नात्यावर परिणाम होतो, 26 टक्के यामुळे निराश किंवा अस्वस्थ होता, तसेच 24 टक्के त्यांचे मित्र गमावतात.
ऑनलाइन छळाशी लढा देण्यासाठी
सर्व डिव्हाइजेसवर तुमच्या ऑनलाइन उपस्थितीचा आढावा घ्या :
तुमची सुरक्षा आणि व्यक्तिगतता सेटिंग तपासून पहा.
नियमितपणे पासवर्ड बदलत राहा.
समस्या उद्भवलीच, तर ती तातडीने ओळखा आणि पटकन कार्यवाही करा :
अपराध्याला प्रतिसाद देऊ नका.
संदेश, छायाचित्र किंवा चित्रफित कॉपी करून छळाचे सर्व पुरावे ठेवा.
ऑनलाइन छळ होताना तुम्ही पाहिले, तर पीडिताला साहाय्य करा आणि त्याचे वागणे खपवून घेतले जाणार नाही, हे अपराध्याला परिस्थिती पाहून सुनावा.
तक्रार :
छळवणुकीसारखे वाटणारे जर कुणी अनुचित बोलले किंवा केले, तर त्याची तक्रार संबंधित यंत्रणांकडे तातडीने करा. ऑनलाइन आक्षेपार्ह मजकूर झळकल्यास संकेतस्थळ चालकाला फोन किंवा ईमेल करा आणि हा मजकूर काढून टाकण्याची विनंती करा.