एकच पिन करेल सर्व फोन चार्ज; सर्व कंपन्यांना द्यावा लागेल एकसमान चार्जिंग पाेर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 06:47 AM2024-06-28T06:47:17+5:302024-06-28T06:47:40+5:30

सर्व कंपन्यांना द्यावा लागेल एकसमान चार्जिंग पाेर्ट; सरकार करणार नियम

A single PIN will charge all phones All the companies have to pay uniform charging part | एकच पिन करेल सर्व फोन चार्ज; सर्व कंपन्यांना द्यावा लागेल एकसमान चार्जिंग पाेर्ट

एकच पिन करेल सर्व फोन चार्ज; सर्व कंपन्यांना द्यावा लागेल एकसमान चार्जिंग पाेर्ट

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अनेक फाेनला वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर आणि पिन असलेल्या चार्जिंग केबल्स लागतात. आता ही कटकट कायमची मिटणार आहे. सरकारने सर्व नव्या स्मार्ट फाेन्स आणि टॅबलेटसाठी एकसारखे पिन असलेली चार्जिंग केबल पुरविण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, ‘यूएसबी-सी’ प्रकारच्या चार्जिंग पाेर्टला जाेडता येईल, अशा केबल्स पुरवाव्या लागणार आहेत. पुढील वर्षी जून महिन्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

काही ब्रँडसाठी वेगळ्या प्रकारचे चार्जिंग पाेर्ट आणि केबल्स लागतात. त्यांचा त्रास आता कमी हाेणार आहे. केंद्रीय आयटी मंत्रालय येत्या काही आठवड्यांत यासंदर्भात स्मार्ट फाेन उत्पादक कंपन्यांना निर्देश देऊ शकते. समान चार्जिंग पाेर्टच्या सक्तीतून बेसिक किंवा साधे फाेन, वेअरेबल्स जसे की स्मार्ट वाॅच यांंसारखी उपकरणे वगळण्यात आली आहेत.

युराेपमध्ये झाली अंमलबजावणी
युराेपियन युनियनने वर्ष २०२२ मध्ये विविध उपकरणांसाठी एकसमान चार्जर आणि चार्जिंग केबलची अंमलबजावणी सुरू केली. यामुळे खर्चही कमी हाेताे; तसेच वाढत्या इलेक्ट्रॅनिक कचऱ्यावरही आळा घालता येताे.

लॅपटाॅपसाठी अंमलबावणी कधी?
- स्मार्ट फाेन्स आणि टॅबलेटसाठी २०२५पासून नवे नियम लागू हाेऊ शकतात. तर लॅपटाॅपसाठी याची अंमलबजावणी २०२६पासून हाेईल. 
- भारताने युराेपियन स्टँडर्डस् स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी अतिरिक्त सहा महिन्यांचा वेळ सर्व उत्पादकांना देण्यात येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

५ अब्ज - माेबाइल फाेन ई-कचऱ्यात २०२२मध्ये गेले, असा अंदाज आहे.
४१ दशलक्ष  - टन एवढा ई-कचरा माेबाइलद्वारे दरवर्षी निर्माण हाेताे.
१६% - इ-कचरा रिसायकल केला जाताे.
१०% - इ-कचरा हा माेबाइल फाेनशी संबंधित आहे. भारत आणि चीनमध्ये वापरलेल्या फाेनची सर्वांत माेठी बाजारपेठ आहे.

सी-टाइप पाेर्टचे फायदे काय?
- फास्ट चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी सी-टाइप पाेर्ट अतिशय उपयुक्त आहे.
- १९९६ पासून या पाेर्टचा वापर हाेत आहे. २०००मध्ये मायक्राे यूएसबी पाेर्टचा वापर सुरू झाला.
- सी-टाइपमध्ये २४ पिन असतात. काेणत्याही बाजूने केबल वापरता येते.

कंपन्यांनी केले स्वागत
माेबाइल उत्पादक कंपन्यांनी या नियमाचे स्वागत केले आहे. यामुळे ई-कचरा कमी करण्यास मदत हाेईल. तसेच कंपन्यांचाही खर्च कमी हाेईल. 

Web Title: A single PIN will charge all phones All the companies have to pay uniform charging part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल