जग आभासी, तरीही ‘प्रत्यक्ष’ गाठीभेटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 09:21 AM2022-10-10T09:21:55+5:302022-10-10T09:22:03+5:30

म्हणजे कसं? तर प्रत्यक्ष न जाता, पण प्रत्यक्ष गेल्यासारखं! कविकल्पना वाटते ना? एखाद्या साय-फाय पिक्चरमधली आयडिया वाटते, पण ही आयडिया प्रत्यक्षात येणं फार लांब नाहीये.

A virtual world, yet a 'real' time! | जग आभासी, तरीही ‘प्रत्यक्ष’ गाठीभेटी!

जग आभासी, तरीही ‘प्रत्यक्ष’ गाठीभेटी!

Next

समजा, आपल्याला एखाद्या मंत्रालयात काम आहे. अशा वेळी आपण काय करतो? तर आपण जिथे राहतो तिथून उठायचं, एसटी, ट्रेन किंवा स्वतःच्या गाडीत बसायचं आणि थेट मंत्रालय गाठायचं किंवा फार फार तर तिथे आपलं काम करून देऊ शकणारा कोणीतरी माणूस शोधायचा, पण असा माणूस सापडला, तरी आपल्याला जावं तर लागतंच, पण समजा, एखादं मंत्रालय मेटाव्हर्समध्ये काम करायला लागलं तर?

म्हणजे कसं? तर प्रत्यक्ष न जाता, पण प्रत्यक्ष गेल्यासारखं! कविकल्पना वाटते ना? एखाद्या साय-फाय पिक्चरमधली आयडिया वाटते, पण ही आयडिया प्रत्यक्षात येणं फार लांब नाहीये. इतकंच नाही, तर संयुक्त अरब अमिराती य देशाने त्यांचं अर्थमंत्रालय या मेटाव्हर्समध्ये उघडण्याची घोषणाही करून टाकली आहे. अर्थात, मेटाव्हर्स ही संकल्पना अजून बाल्यावस्थेत आहे. ती प्रत्यक्षात यायला अजून दहा ते वीस वर्षं लागतील, असा अंदाज आहे, पण तसाच विचार केला, तर वीस वर्षं हा काही फार मोठा कालावधी नव्हे.
व्हर्च्युअल जग ही सुद्धा सुमारे वीस वर्षांपूर्वी निव्वळ कविकल्पना होती. मात्र आज आपण त्याच जगात कित्येक गोष्टी करत असतो. मुळात व्हर्च्युअल जग म्हणजे काय? तर जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित न राहता एखादी गोष्ट, एखादं काम करू शकतो, ते जग म्हणजे व्हर्च्युअल जग.

आज आपण या जगात एकमेकांशी लिहून बोलू शकतो, व्हिडीओ कॉल करून एकमेकांना बघू शकतो, समोरासमोर बोलल्यासारख्या गप्पा मारू शकतो. एकमेकांना दुसऱ्या गावी राहून प्रेझेंटेशन देऊ शकतो. बँकेचे व्यवहार करू शकतो. खरेदी करू शकतो, पण तरीही… तरीही आपण एकमेकांना केवळ स्क्रीनवरच बघू शकतो. आपण एकमेकांना प्रत्यक्षात भेटतो आहोत, असा आभास काही व्हिडीओ कॉल आणि चॅटिंगमधून निर्माण होत नाही, पण तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे तेही आता सहज होणार आहे. त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे मेटाव्हर्स. 
एकमेकांसमोर नसलेल्या माणसांना एकमेकांना प्रत्यक्ष, त्रिमितीत एकमेकांना भेटल्याचा फिल देणारं तंत्रज्ञान म्हणजे मेटाव्हर्स! अर्थात, हा मेटाव्हर्सचा फार महत्त्वाचा हिस्सा असला, तरी मेटाव्हर्स ही संकल्पना तेवढ्यापुरती मर्यादित नाही. मुळात ती संकल्पना अजून आकार घेत असल्याने, त्यात नेमकं काय काय असेल, हे नेमकं कोणीच सांगू शकत नाही. मात्र, त्यात ज्या गोष्टी नक्की करता येतील, त्यांचा विचार केला, तरी ते किती कमाल असणार आहे, हे लक्षात येतं.

मेटाव्हर्स या आभासी जगात माणसं एकमेकांना भेटू शकतील, अभ्यास करू शकतील, खेळू शकतील अशी कल्पना आहे आणि याच कल्पनेचा विस्तार करत संयुक्त अरब अमिरातीने त्यांचं अर्थमंत्रालय या मेटाव्हर्समध्ये काम करेल, असं जाहीर केलं आहे. मेटाव्हर्सचा वापर सरकारी कामासाठी करण्याची घोषणा करणारा संयुक्त अरब अमिराती हा जगातील पहिला देश आहे. संयुक्त अरब अमिराती म्हणजे केवळ पेट्रोलमधून मिळालेला पैसा असं समीकरण जरी जगाच्या डोक्यात पक्कं असलं, तरी दुबईच्या एकूण उत्पन्नापैकी केवळ ५ टक्के खनिज तेलातून मिळतं. त्याशिवाय पर्यटन, व्यवसाय, ट्रेडिंग हे संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहेत.
दुबई मेटाव्हर्स असेम्ब्लीच्या उद्घाटनाच्या वेळी अब्दुल्ला बिन तुर्क अल मारी म्हणाले, “आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना मेटाव्हर्समध्ये काम करण्याचं प्रशिक्षण दिलं. कारण अधिकाधिक कंपन्यांना त्या पद्धतीने काम करणं सोयीचं आहे.”
संयुक्त अरब अमिरातीने आजवर २,७२३ फूट उंच बुर्ज खलिफासारखे अनेक मोठे आणि धाडसी प्रकल्प राबविलेले आहेत. आज या देशाची अपेक्षा अशी आहे की, मेटाव्हर्समुळे त्यांच्या वार्षिक जीडीपीमध्ये चार बिलियन डॉलर्सची भर पडेल. 

‘उद्या’चं तंत्रज्ञान ‘आज’च तयार! 
जगातील सर्वोच्च १० मेटाव्हर्स अर्थव्यवस्थांमध्ये आपला समावेश व्हावा, यासाठी दुबई प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्यांना ब्लॉकचेन आणि तत्सम तंत्रज्ञान वापरणाऱ्या १,००० कंपन्यांना दुबईत आमंत्रित करायचं आहे. अल मारी म्हणतात, त्याप्रमाणे मेटाव्हर्स हे उद्याचं तंत्रज्ञान आहे. सगळ्या जगाला कधी ना कधी त्या दिशेने जाणं भागच होतं. मात्र, कोविड काळातील परिस्थितीमुळे ती वेळ नजीकच्या भविष्यकाळात येऊन ठेपलेली आहे.त्याचबरोबर, २०३० सालापर्यंत ४०,००० नवीन नोकऱ्या मेटाव्हर्समुळे निर्माण होतील, असं त्यांना वाटतं आहे.

Web Title: A virtual world, yet a 'real' time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.