सावधान! फोन कॉलवर 'असा' चोरी होऊ शकतो तुमचा OTP; Cyber Dost ने केलं लोकांना अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 06:59 PM2022-01-14T18:59:01+5:302022-01-14T19:00:39+5:30
Cyber Dost Alert : फोन कॉल किंवा मेसेजच्या माध्यमातून हॅकर्स घरबसल्या लोकांची बँक खाती रिकामी करतात. सायबर गुन्हेगार नवीन मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत.
नवी दिल्ली - सध्याच्या डिजिटल जगात फसवणूक करण्याच्या नवनवीन पद्धती वापरल्या जात आहेत. फोन कॉल किंवा मेसेजच्या माध्यमातून हॅकर्स घरबसल्या लोकांची बँक खाती रिकामी करतात. सायबर गुन्हेगार नवीन मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत. कोरोनाच्या काळात ज्या वेगाने ऑनलाईन व्यवहार आणि डिजिटल पेमेंट वाढलंय, त्यामुळे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. याच दरम्यान आता कोणत्याही अनोळखी लिंक्स, आकर्षक ऑफर्स आणि अनोळखी (Cyber Dost Alert) कॉल्सपासून सावध राहा. सायबर गुन्ह्यांची वाढती प्रकरणं पाहता सरकारही वेळोवेळी लोकांना सतर्क करत असतं.
सायबर क्राईमबद्दल (Cyber Crime) लोकांना जागरूक करण्यासाठी गृह मंत्रालयाने सायबर दोस्त नावाचे अॅप (Cyber Dost App) देखील तयार केलं आहे. सरकारने सायबर दोस्तच्या माध्यमातून एका नव्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. लोकांना OTP द्वारे होणाऱ्या फसवणुकीबद्दल सतर्क केलं आहे. एखाद्याला कॉल करूनही OTP चोरला जाऊ शकतो असं म्हटलं आहे. अनोळखी व्यक्तीशी फोनवर बोलत असताना कधीही कॉल मर्ज करू नये, असा सल्ला सरकारने दिला आहे. कॉल मर्ज होताच, फसवणूक करणारे ओटीपी जाणून घेऊन तुमचं खातं हॅक करू शकतात. सावध राहा.
Don't merge any call, while talking on phone with any unknown person, cyber criminals may get your OTP to misuse. #CyberSecurityAwarenesspic.twitter.com/E6mnnMiVGM
— Cyber Dost (@Cyberdost) January 13, 2022
तुम्ही फसवणुकीचे बळी असाल तर तुम्ही तुमची तक्रार cybercrime.gov.in वर नोंदवू शकता असं म्हटलं आहे. डिजिटल पेमेंट करताना तुमच्या फोनवर OTP नंबर येतो. या OTP नंतरच तुमचा व्यवहार पूर्ण होईल. लक्षात ठेवा की तुमचा OTP नंबर कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका. बँक खाते, एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड माहिती शेअर केल्याने तुमचं खातं रिकामं होऊ शकतं.
सायबर सिक्युरिटी कंपनी कॅस्परस्कीचे संचालक दिमित्री बेस्टुझेव यांनी व्हॉट्सअॅपमध्ये अनेक सुरक्षेतील त्रुटी आहेत. युजर्सनी त्यांची कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती WhatsApp वर शेअर करू नये असं म्हटलं आहे. तसेच हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की, अनेकांना जरी सुरक्षित वाटत असलं तरी व्हॉट्सअॅप हे सुरक्षित व्यासपीठ नाही. ते म्हणाले की, स्कॅमर व्हॉट्सअॅप युजर्सच्या डेटावर लक्ष ठेवून आहेत आणि लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी मोठ्या संधी शोधत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.