TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 06:18 PM2024-10-04T18:18:13+5:302024-10-04T18:18:56+5:30
TRAI : ट्रायने आपल्या एक्स हँडलवरून ही माहिती शेअर केली आहे.
नवी दिल्ली : फेक कॉल आणि मेसेजला आळा घालण्यासाठी ट्रायने (TRAI) १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू केले आहेत. आता यूजर्सना येणारे फेक कॉल्स आणि मेसेज ऑपरेटर स्तरावरच ब्लॉक केले जातील. ट्रायने घोटाळेबाजांना पुन्हा एकदा जोरदार झटका दिला असून गेल्या ४५ दिवसांत १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स आणि ६८० एंटिटीज (संस्थांना) ब्लॉक केल्या आहेत.
ट्रायने आपल्या एक्स हँडलवरून ही माहिती शेअर केली आहे. ट्रायने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्पॅमर्सवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सर्व्हिस प्रोव्हायडर्सना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या ४५ दिवसांत ६८० एंटिटीज ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. तसेच १८ लाख मोबाईल नंबर्सची सेवा बंद करण्यात आली आहे.
१ कोटींहून अधिक मोबाईल नंबर्स बंद
याआधीही ट्रायने घोटाळ्यात सहभागी झाल्यामुळे लाखो मोबाईल नंबर्स ब्लॉक केले होते. आतापर्यंत, ट्रायने १ कोटींहून अधिक मोबाईल नंबर्सवर कारवाई करून त्यांची सेवा बंद केली आहे. गेल्या महिन्यातही ट्रायने कठोर भूमिका घेत ३.५ लाख मोबाईल क्रमांक ब्लॉक केले होते. दूरसंचार विभाग आणि ट्राय युजर्सना स्पॅम फ्री सर्व्हिस क्वालिटी देण्यासाठी दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे. ट्रायने टेलिकॉम ऑपरेटर्सना बल्क कनेक्शन, रोबोटिक कॉल्स आणि प्री-रेकॉर्डेड कॉल्स ब्लॉक करण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. सप्टेंबरमध्येही ट्रायने ३.५ लाख अनव्हेरिफाइड एसएमएस हेडर आणि १२ लाख कॉन्टेंट टेम्पलेट ब्लॉक केले होते.
TRAI has issued strict instructions to service providers to act swiftly against spammers. As a result service providers black-listed more than 680 entities and disconnected 18 lacs numbers during last one and half month.
— TRAI (@TRAI) October 4, 2024
ट्रायचा नवीन नियम
१ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या नियमात, ट्रायने नेटवर्क ऑपरेटरना टेक्नॉलॉजीटा वापर करून URL, APK लिंक, OTT लिंक असलेले मेसेज ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. युजर्सला कोणतेही URL असलेले कोणतेही मेसेज प्राप्त होणार नाहीत. युजर्सना केवळ व्हाइटलिस्टमध्ये असलेल्या संस्था आणि टेलिमार्केटरकडून लिंक असलेले मेसेज प्राप्त होतील. तसेच, ट्रायने सुचविलेल्या मेसेज टेम्प्लेटवर आधारित URL किंवा OTP सारखी इतर संवेदनशील माहिती असलेले मेसेज व्हाइटलिस्ट करण्यात टेलिमार्केटर सक्षम असतील. युजर्सना व्हाइटलिस्टमध्ये नसलेल्या संस्था किंवा टेलिमार्केटरकडून मार्केटिंग करणारे कॉल येणार नाहीत.
...तर तुमचे होऊ शकते सिम ब्लॉक?
ट्रायचा हा नियम सर्व मोबाइल नंबरवर लागू होतो, ज्याद्वारे मार्केटिंग कॉल केले जातात. तुम्ही तुमच्या वैयक्तिक नंबरवरून मार्केटिंग किंवा कोणत्याही प्रकारचे प्रमोशनल कॉल करत असल्यास ट्राय तुमचे सिम ब्लॉक करू शकते. मार्केटिंग कॉल करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात कनेक्शन घ्यावे लागेल, ज्यासाठी ट्रायने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.