Adani 5G Service: अदानींनी काढता पाय घेतला; ग्रुप 5G लाँच करणार, पण जिओ, एअरटेलसारखा नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 08:46 AM2022-08-22T08:46:49+5:302022-08-22T08:47:15+5:30
अदानी ग्रुपने जेव्हा स्पेक्ट्रमच्या लिलावामध्ये भाग घेतला होता तेव्हा त्यांच्याकडे लायसन्स नव्हते. अदानींनी एकच स्पेक्ट्रम विकत घेतला. यावरूनच सारे लक्षात येते.
अदानी ग्रुप आता टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात अदानींनी अचानक एन्ट्री केली होती. यावेळी जसे फोर जी वेळी झालेले तसेच ५जी वेळी होईल असे वाटत होते. अदानींची कंपनी फाईव्ह जी सुरु करून जिओ, एअरटेलला टक्कर देईल असे वाटत होते. परंतू तसे होणार नाहीय. अदानी ग्रुपने ते केवळ B2B स्पेसमध्येच सेवा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
यामुळे अदानी हे कंझ्युमर मोबिलिटी स्पेसमध्ये एन्ट्री करणार नाहीत. रिपोर्टनुसार अदानींची कंपनी 6 सर्कलमध्ये सेवा देण्यास सुरुवात करणार आहे. अदानी डेटा नेटवर्कने सहा सर्कलमध्ये युनिव्हर्सल लायसन्ससाठी अप्लाय केला आहे. ही तीच सर्कल आहेत, जिथे अदानींना टेलिकॉम क्षेत्रात राहण्यासाठी टेलिकॉम सेवा देणे बंधनकारक आहे. अदानी ग्रुप फास्ट 5G नेटवर्क सर्व्हिसची सुरुवात करेल. परंतू यासाठी कंपनीला लायसन्सची गरज आहे.
अदानी ग्रुपने जेव्हा स्पेक्ट्रमच्या लिलावामध्ये भाग घेतला होता तेव्हा त्यांच्याकडे लायसन्स नव्हते. अदानींनी 26 GHz मध्ये 400 MHz चा स्पेक्ट्रम खरेदी केला होता. यासाठी त्यांनी २१२ कोटी रुपये मोजले होते. तसेच मिड बँड स्पेक्ट्रममध्ये त्यांनी भाग घेतला नव्हता. हाच स्पेक्ट्रम ग्राहकांसाठी खूप महत्वाचा होता. यावरून अदानींनी जरी ५जी स्पेक्ट्रम घेतला असला तरी ते जिओ, एअरटेल आणि व्हीआयच्या सामान्य ग्राहकांच्या श्रेणीत लुडबुड करणार नाहीत हे स्पष्ट झाले होते.
कंझ्यूमर स्पेसमध्ये इतरांनी पाय रोवल्यानंतर अदानी ग्रुप यात उतरेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे येत्या काही वर्षांत अदानी ग्रुप या क्षेत्रात एन्ट्री करेल. तोवर बराच काळ गेलेला असेल. यामुळे सध्या तरी जिओ आणि अदानी यांची टक्कर होणार नाहीय. तसेच अदानींमुळे ग्राहकांना काहीच फायदा होणार नाहीय.