मोबाईल व्हायब्रेट झाल्याचा सारखा भास होतोय... वेळीच सावध व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 10:16 PM2018-09-04T22:16:19+5:302018-09-04T22:17:52+5:30
खिशामध्ये फोन नसेल तर अंगाला व्हायब्रेट झाल्याचा भास होतो. हा एक डिजिटल सिंड्रोमचा भाग असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
युवापिढी स्मार्टफोनच्या आहारी गेली आहे. मोबाईल नजरेसमोर नसेल तर कासाविस व्हायला होते. संदेश किंवा फोम आला नसेल तरीही दिवसातून जवळपास 150 वेळा फोन तपासला जातो. खिशामध्ये फोन नसेल तर अंगाला व्हायब्रेट झाल्याचा भास होतो. हा एक डिजिटल सिंड्रोमचा भाग असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
मोबाईल फोन लोकांची रोजची कामे सोपी करतो. कोणाचातरी मेसेज किंवा फोन आला आणि तो न उचलला जाण्याच्या भीतीने ग्रासले जाते. यामुळे उगाचच फोनकडे लक्ष जाते. जवळ फोन नसला तरीही तो वाजल्याचा किंवा व्हायब्रेट झाल्याच भास होतो. याला डिजिटल व्यसन म्हणतात. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाने यावर संशोधन केले आहे.
फेसबुकवर जर सारखे फोटो टाकण्याची सवय असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या मित्रांनी काही पोस्ट केले असेल का याची हुरहुर लागलेली असते. याला फेसबुक एडिक्शन डिसऑर्डर (फॅड) असे म्हणतात. तसेच आपल्या फोटोला आलेले लाईक, कमेंटवरूनही अस्वस्थ व्हायला होते.
मोबाईल कंपन्या सध्या सेल्फीसाठी असे वेगळे फोन तयार करत आहेत. या सेल्फीच्या व्यसनामुळे बऱ्याचदा जीवही गेल्याच्या बातम्या वाचतो. कुठेही गेले की सारखे सेल्फी घेण्याच्या सवयीमुळे आजुबाजुच्या वातावरणाचा आनंद घेता येत नाही. तसेच हे फोटो सारखे सोशल मिडियावर पोस्ट केले जातात. याला सेल्फाइटिस असे म्हणतात.
अशाप्रकारचे बरेच आजार सध्याच्या पिढीला होत आहेत. ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसनही यामध्ये आहे.