6G आल्यावर स्मार्टफोनचं युग संपणार? मानवाच्या मेंदूत चिप बसणार, Nokia CEO ची भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 03:50 PM2022-06-02T15:50:25+5:302022-06-02T15:50:35+5:30
Nokia चे CEO Pekka Lundmark यांनी 6G आणि स्मार्टफोन्सविषयी एक भविष्यवाणी केली आहे.
मानवाला मोबाईलचा शोध लावण्यास अनेक वर्ष लागलीत परंतु मोबाईलवरून स्मार्टफोन पर्यंतचा प्रवास खूप कमी काळात पूर्ण झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञान वेगानं बदलत आहे. यात काही गॅजेट्स काळाच्या ओघात मागे देखील पडले आहेत. त्यानुसार स्मार्टफोन्सचा वापर देखील बंद होऊ शकतो आणि या युगाचा अंत होऊ शकतो.
Nokia च्या CEO ची भविष्यवाणी
Nokia चे CEO Pekka Lundmark यांच्या मते, साल 2030 पर्यंत 6G टेक्नॉलॉजी सुरु झाली असेल. परंतु तोपर्यंत या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी स्मार्टफोन ‘कॉमन इंटरफेस’ असणार नाही. ते दावोसमध्ये सुरु असेलल्या World Economic Forum मध्ये बोलत होते.
त्यांनी म्हटलं आहे की 2030 पर्यंत 6G व्यवसायिकरित्या उपलब्ध होईल. परंतु त्याआधीच लोक स्मार्टफोनच्या ऐवजी स्मार्ट ग्लासेस आणि अन्य डिव्हाइसेजना पसंती देतील. नोकिया सीईओनी सांगितलं की, “तेव्हा आपण जे स्मार्टफोन्स वापरत आहोत, त्यांचा इंटरफेस म्हणून जास्त वापर केला जाणार नाही. तर अनेक वियरेबल्स थेट आपल्या शरीरात सापडू लागतील.”
मेंदूत बसेल चिप
Lundmark यांनी शरीरात कोणते डिवाइस फिट केले जातील याची माहिती दिली नाही. परंतु इलॉन मस्क यांची Neuralink आणि अन्य काही कंपन्या सध्या अशा चिपवर काम करत आहेत, जी मेंदू जवळ बसवली जाईल. ही चिप ब्रेन कम्प्यूटर इंटरफेस तयार करू शकते. याचा डेमो व्हिडीओ एका मकाक (आफ्रिकन माकड) सोबत गेल्यावर्षी दाखवण्यात आला होता. सध्या ही चिप मेंदूकडून येणारे सिग्नल रेकॉर्ड करत आहे.