पब्जीसह २७५ चिनी अॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 10:30 AM2020-07-27T10:30:47+5:302020-07-27T14:28:47+5:30
भारत सरकार आता अॅप्ससाठी नियम व कायदे तयार करीत आहे, यामुळे बंदी घालण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी भारताने चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. तसेच, आता सरकारने पुन्हा आणखी २७५ चिनी अॅप्सची यादी तयार केली आहे. यामध्ये गेमिंग अॅप पब्जी देखील आहे. एका अंदाजानुसार, भारतातचीनी इंटरनेट कंपन्यांचे सुमारे ३०० कोटी युनिक युजर्स आहेत. हे अॅप्स कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय सुरक्षेसाठी किंवा लोकांच्या गोपनीयतेसाठी धोकादायक आहेत का? याबाबत सरकार एक यादी तयार करून, हे तपासत आहे.
यामध्ये जर काही अनियमितता आढळल्यास चीनच्या बंदी अॅप्सची यादी आणखी लांब होण्याची शक्यता आहे. चीन आणि भारत यांच्यातील लडाख सीमेवरील तणावामुळे हे सर्व घडत आहे. सीमेवरील तणावामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे २० सैनिक शहीद झाले होते. तेव्हापासून चीनबद्दल भारतातील लोकांमध्ये संताप आहे.
सरकारने तयार केलेल्या नवीन यादीमध्ये टेंसेंट कंपनीच्या लोकप्रिय गेम पब्जीचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, शाओमीची जिली, ई-कॉमर्स दिग्गज अलिबाबाची अलीएक्सप्रेस आणि टिकटॉकच्या मालकीची कंपनी बाईटडन्सचा रेसो आणि यूलाइक्स अॅप्सचा समावेश आहे. या डेव्हलपमेंटमधील संबंधित व्यक्तीने सांगितले की, सरकार या सर्व २७५ अॅप्स किंवा त्यामधील काही अॅप्सवर बंदी घालू शकते. मात्र, कोणतीही अनियमितता आढळली नाही, तर अॅप्सवर बंदी घातली जाणार नाही.
गृह मंत्रालयाने अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, संबंधित एका अधिकृत सुत्रांनी सांगितले की, चीनच्या अॅप्सचा सतत आढावा घेण्यात येत आहे आणि त्यांना कोठून अर्थसहाय्य मिळत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही अॅप्स राष्ट्रीय सुरक्षतेसाठी धोकादायक असल्याचे दिसून आले. तर काही अॅप्स डेटा वाटप आणि गोपनीयता नियमांचे उल्लंघन करीत आहेत.
भारत सरकार आता अॅप्ससाठी नियम व कायदे तयार करीत आहे, यामुळे बंदी घालण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की, सायबर सुरक्षा अधिक बळकट करणे आणि भारतीय नागरिकांच्या डेटाला सुरक्षा पुरवणे ही सरकारची एक मोठी योजना आहे. या नियमांमध्ये आणि मार्गदर्शकतत्त्वांमध्ये अॅपला काहीही करण्याची परवानगी नाही.
माध्यमांच्या वृत्तानुसार, भारताने टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांची चिंता वाढली आहे. जर भारत सरकार २० कोटी युजर्स असलेल्या टिकटॉकवर मोठे कारण नसताना बंदी घालू शकते, तर फेसबुकवरही भारतात बंदी घातली जाऊ शकते, असे मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या फेसबुकच्या कर्मचाऱ्यांसोबत चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सर्वात लोकप्रिय टिकटॉकसह ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये यूसीवेब, हॅलो, शेअराईट आणि वीचॅटसारखे अॅप्स आहेत. याशिवाय लाइकी, कवई, व्हीटोजा सारख्या शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप्सवरही बंदी घातली आहे.
आणखी बातम्या...
'लालू-कवच' असताना सुशीलकुमार मोदींनी कोरोनाला घाबरू नये - राबडी देवी
आपले प्रेरणादायी शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
'हत्ती' vs. 'हात'; सरकारच्या विरोधात मतदान करा; बसपाच्या व्हिपने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी