Meta नंतर आता Google नंही सुरू केली नोकर कपात, कुणावर होणार परिणाम? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 04:13 PM2023-03-07T16:13:31+5:302023-03-07T16:14:45+5:30
मेटाकडून पुन्हा एकदा कर्मचारी कपात केल्याची बातमी चर्चेचा विषय ठरत असतानाच आता गुगलनेही आपल्या चीनमधील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली आहे.
मेटाकडून पुन्हा एकदा कर्मचारी कपात केल्याची बातमी चर्चेचा विषय ठरत असतानाच आता गुगलनेही आपल्या चीनमधील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी जानेवारीमध्ये जागतिक स्तरावर १२,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना जाहीर केल्यानंतर गुगलच्या चीन विभागाने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे.
अहवालानुसार, गुगल चायना कार्यालयातील नोकर कपातीची घोषणा पगार रीसेट करण्यासाठी आहे. याशिवाय, एकूण कामाची कार्यक्षमता सुधारण्याचा आणि ऑपरेटिंग खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे. गुगल चायना ऑफिसमधील नोकरकपातीच्या या फेरीत सर्वाधिक पगार असलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर सर्वात मोठा परिणाम होईल.
काही कर्मचारी सदस्यांना गेल्या महिन्याचा पगार, स्टॉक आणि वार्षिक रजा सवलत, CNY 30,000 (३.५ लाख रुपये) रोख आणि वैद्यकीय विमा मिळेल. पण त्यांनी १० मार्चपूर्वी नोकरी सोडणं आवश्यक असणार आहे. काही कर्मचार्यांना तीन महिन्यांचा बफर कालावधी देखील दिला जात आहे जेथे त्यांना पगार मिळेल परंतु त्यांनी काम करण्याची आवश्यकता नाही.
Google India
चीनपूर्वी गुगलने भारतातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली होती. गेल्या महिन्यात कंपनीने वेगवेगळ्या विभागातील सुमारे ४५० कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकले. गुगल इंडियाची प्रमुख कार्यालये गुरुग्राम, बेंगळुरू आणि हैदराबाद येथे आहेत. दरम्यान, गुगलच्या सिंगापूर कार्यालयाने काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. त्यावेळी गुगल इंडियाचे व्हीपी संजय गुप्ता यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात कंपनीने उत्पादन क्षेत्र आणि कार्यांचा आढावा घेतल्याचे सांगितले होते. ते म्हणाले की, आम्ही अमेरिकेतील बाधित कर्मचाऱ्यांना आधीच एक वेगळा ईमेल पाठवला आहे. इतर देशांमध्ये, स्थानिक कायद्यांमुळे या प्रक्रियेला जास्त वेळ लागेल. गुगलचे मागील प्रोग्राम मॅनेजर निकोल त्साई यांनी सांगितले की नोकर कपात ऐनवेळी वाटेल तशी केली गेली आणि यासाठी कोणाचाही सल्ला घेण्यात आला नाही.