आता फ्लाइटमध्ये इंटरनेटशिवाय पाहता येणार OTT कंटेंट; Air Asia आणि Sugarbox ने सुरू केली Airflix ची नवीन सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 05:00 PM2022-11-23T17:00:40+5:302022-11-23T17:02:50+5:30
Airflix : या सेवेअंतर्गत युजर्सना 6000 तासांपेक्षा जास्त एचडी कंटेंट, 1000 हून अधिक हॉलीवूड आणि बॉलीवूड फिल्म आणि वेब कंटेंट पाहण्याची संधी मिळणार आहे.
नवी दिल्ली : एअर एशिया इंडियाने (Air Asia India) हायपरलोकल क्लाउड प्लॅटफॉर्म शुगरबॉक्ससह (SugarBox) नवीन भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. या भागीदारी अंतर्गत, प्रवाशांना आता AirAsia फ्लाइट्सवर मोफत OTT कंटेंट पाहण्याची संधी मिळणार आहे. एअर एशिया आणि शुगरबॉक्स यांनी संयुक्तपणे एअरफ्लिक्स (AirFlix) सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत युजर्सना 6000 तासांपेक्षा जास्त एचडी कंटेंट, 1000 हून अधिक हॉलीवूड आणि बॉलीवूड फिल्म आणि वेब कंटेंट पाहण्याची संधी मिळणार आहे.
एअरफ्लिक्स सेवेसह युजर्सना इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी शिवाय म्हणजेच इंटरनेटशिवाय कंटेंटचा अनुभव घेता येईल. एअर एशिया आणि शुगरबॉक्सची ही सेवा पेटंट क्लाउडवर आधारित आहे. विशेष बाब म्हणजे युजर्सना कंटेंट पाहताना फ्लाइटमध्ये बफरिंग सारखी कोणतीही समस्या येणार नाही. युजर्सना 1Gbps पर्यंत स्पीड आणि 8TB स्टोरेज मिळेल. युजर्स फ्लाइटमध्येच बातम्या वाचण्यासोबत गेमिंगचा अनुभव घेऊ शकतील. तसेच, युजर्स ऑनलाइन शॉपिंग देखील करू शकणार आहेत.
विशेष म्हणजे, आतापर्यंत कंटेंट पाहण्याची सुविधा एअर विस्तारामध्ये उपलब्ध आहे. पण युजर्सकडे बातम्या वाचणे, भारतीय वेब सिरीज पाहणे आणि खरेदी करणे असे पर्याय नाहीत. "एअर एशिया इंडियासोबत 'एअरफ्लिक्स'च्या माध्यमातून फ्लाइटचा अनुभव बदलण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. जागतिक स्तरावर हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे, जिथे आम्ही शुगरबॉक्सच्या पेटंट क्लाउड फ्रॅगमेंट टेक्नॉलॉजीचा वापर करून क्लाउडची शक्ती फ्लाइटसाठी आणत आहोत", असे शुगरबॉक्सचे सह-संस्थापक रोहित परांजपे यांनी सांगितले.
याचबरोबर, रोहित परांजपे यांनी या सेवेबद्दल आणखी स्पष्ट केले की 'एअरफ्लिक्स' उद्योगात पहिल्यांदाच अनेक सेवा प्रदान करेल - जसे की OTT अॅप्स, ई-कॉमर्स, बातम्या, पॉडकास्ट आणि इन-फ्लाइट एफ अँड बी ऑर्डरिंगसाठी अॅक्सेस. ही सुविधा हायपरलोकल अनुभवांद्वारे ग्राहकांना अमर्याद संधी उपलब्ध करून देण्याची ही केवळ सुरुवात आहे. एअरफ्लिक्सच्या शक्यतांबद्दल खूप उत्सुक आहे आणि पाहुणे प्रवासी त्याचा वापर करतातहे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे, असेही रोहित परांजपे यांनी सांगितले.