Airtel, Jio 5G Sim Launch: एअरटेल, जिओची 5G Sim काही तासांत लाँच होणार; नेटवर्क लाँचिंगला दोनच दिवस उरले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 10:49 AM2022-09-29T10:49:51+5:302022-09-29T10:50:35+5:30
व्होडाफोन-आयडियाच्या नेटवर्कचे काही खरे दिसत नाहीय. यामुळे त्यांची ५ जी सेवा कधी येईल हे देखील कंपनीला सांगता येत नाहीय.
भारतात लवकरच म्हणजेच पुढील दोन दिवसांनी ५जी सर्व्हिस लाँच होणार आहे. १ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ५जी नेटवर्कची सुरुवात करणार आहेत. हा इव्हेंट ४ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. रिपोर्टनुसार या इव्हेंटमध्येच जिओ 5G आणि एअरटेल 5G लाँच होणार आहेत. मोदी या दोन्ही कंपन्यांची 5G सेवा लाँच करण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. Indian Mobile Congress च्या या इव्हेंटमध्ये मुकेश अंबानी, सुनिल मित्तल आणि कुमार मंगलम बिर्ला देखील सहभागी होणार आहेत. जिओ आणि एअरटेल या दोनच कंपन्यांची ५जी सेवा भारतात सुरु होणार आहे. व्होडाफोन-आयडियाच्या नेटवर्कचे काही खरे दिसत नाहीय. यामुळे त्यांची ५ जी सेवा कधी येईल हे देखील कंपनीला सांगता येत नाहीय.
एअरटेल सुरुवातीला ५जी सेवा १३ शहरांमध्ये सुरु होईल, यानंतर अन्य शहरांमध्ये नेटवर्क उभे केले जाईल. रिलायन्स कदाचित देशभरात नेटवर्क सुरु करू शकते. एअरटेलच्या सीईओंनी काही दिवसांपूर्वी ५जी ची सिमकार्ड तयार केलेली आहेत, असे सांगितले होते. यामुळे नवीन सिमकार्ड घ्यावी लागणार हे नक्की झाले आहे.
मुकेश अंबानी यांनीही यावर्षी झालेल्या रिलायन्सच्या एजीएममध्ये सांगितले होते की, दिवाळीपर्यंत Jio 5G सेवा सुरू होईल. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत देशभरात त्याचे रोलआउट केले जाईल. पॅन इंडिया 5G नेटवर्कच्या विस्तारासाठी कंपनी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. इंडियन मोबाईल काँग्रेसनेही एका ट्विटमध्ये माहिती दिली होती की भारतात 5G सेवा 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्याचे लोकार्पण पीएम मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले.
जिओ, एअरटेल आणि व्ही या तीन कंपन्यांव्यतिरिक्त अदानींच्या अदानी डेटा नेटवर्कनेही स्पेक्ट्रम लिलावात भाग घेतला होता. परंतू अदानी अद्याप तरी या सेक्टरमध्ये उतरण्याची तयारी करत नाहीय. कंपनी एंटरप्राइझ सेगमेंटमध्ये सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे.