Jio Airtel Vi च्या प्लॅन्सचे दर निम्म्यावर येणार; ट्रायने आणला फक्त इनकमिंग रिचार्जचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 05:11 PM2023-02-10T17:11:10+5:302023-02-10T17:14:41+5:30
दूरसंचार कंपन्यांना सरकारची ही योजना आवडलेली नाही. मात्र, सध्या मोठ्या लोकसंख्येला परवडणाऱ्या किमतीत मोबाईल टॅरिफची सुविधा उपभोगता येत नाही, असे सरकारचे मत आहे.
सुरुवातीला १००-१५० रुपयांत २८ दिवसांचे रिचार्ज देणाऱ्या एअरटेल, रिलायन्स जिओसारख्या टेलिकॉम कंपन्यांनी हीच रिचार्ज आता २००-२५० पार नेऊन ठेवली आहेत. दिवसेंदिवस मोबाईल रिचार्ज महाग होत चालली आहेत. तसेच आता कंपन्यांनी दर महिन्याला रिचार्ज मारणे बंधनकारक केले आहे. यामुळे सर्वसामान्यांना सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी पैसे मोजावेच लागत आहेत.
असे असताना ट्रायने यावर दिलासा देण्यासाठी अनोखा प्रस्ताव या कंपन्यांसमोर ठेवला आहे. ईटीच्या वृत्तानुसार टेलिकॉम रेग्युलेटरी ट्रायने ड्युअल सिम ठेवणाऱ्यांना फक्त इनकमिंग आणि एसएमएससाठी प्लॅन लाँच करण्याच्या सूचना कंपन्यांना दिल्या आहेत. या प्लॅनमध्ये फक्त इनकमिंग कॉल येणार आहेत, तसेच एसएमएस पाठविता येणार आहेत. यामुळे पहिल्या सिमसोबत दुसरे देखील सिमकार्ड सुरु ठेवण्यासाठीचा जो भूर्दंड आहे तो वाचणार आहे.
हा प्लॅन ज्या लोकांचा जास्त वापर नाहीय त्यांच्यासाठी देखील चांगला राहणार आहे. तसेच दुसरे सिमकार्ड अॅक्टिव्हेट ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी देखील फायद्याचा असणार असून रिचार्जचे दर निम्म्याने कमी होणार आहेत.
दूरसंचार कंपन्यांना सरकारची ही योजना आवडलेली नाही. मात्र, सध्या मोठ्या लोकसंख्येला परवडणाऱ्या किमतीत मोबाईल टॅरिफची सुविधा उपभोगता येत नाही, असे सरकारचे मत आहे. अशा परिस्थितीत, कमी किमतीत इनकमिंग कॉल्स आणि फक्त एसएमएस योजनांची कल्पना सरकारने दूरसंचार कंपन्यांसमोर मांडली आहे. यामुळे नवीन युजरदेखील जोडले जातील. इनकमिंग कॉलिंग आणि एसएमएस पॅकची किंमत नियमित प्लॅनच्या निम्म्याहून कमी असू शकते.
Jio, Airtel आणि Vodafone-Idea सारख्या दूरसंचार कंपन्यांच्या म्हणण्यानुसार असे प्लॅन ARPU वाढविण्यास मदतगार नाहीत. यामध्ये इनकमिंग किंवा आउटगोइंग नेटवर्क अशा दोन्हीचा वापर होईल. यामुळे कमाई कमी होईल आणि आमचे नुकसान होईल.