कार्बनच्या मदतीने एअरटेलने सादर केले दोन किफायतशीर स्मार्टफोन
By Sunil.patil | Published: November 17, 2017 01:50 PM2017-11-17T13:50:04+5:302017-11-17T13:50:22+5:30
एअरटेलने कार्बन कंपनीच्या मदतीने भारतीय ग्राहकांना ए1 इंडियन आणि ए41 पॉवर हे दोन स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली आहे.
रिलायन्स जिओच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी अन्य सेल्युलर कंपन्यांनीही आपापले स्मार्टफोन ग्राहकांना सादर करण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने एअरटेलने काही दिवसांपूर्वीच कार्बन 40 हा स्मार्टफोन सादर केला होता. यासाठी कार्बन कंपनीचे सहकार्य घेण्यात आले होते. आता याच कंपनीसोबत करार करून ए1 इंडियन आणि ए41 पॉवर हे दोन नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीने आपल्या मेरा पहला स्मार्टफोन या मोहिमेच्या अंतर्गत ग्राहकांना उपलब्ध केले आहेत. या दोन्ही मॉडेल्सची एमआरपी प्रत्येकी 4390 रूपये इतकी आहे. मात्र ग्राहकांना यासाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत ग्राहकाला ए1 इंडियन या मॉडेलसाठी 3299 तर ए41 पॉवरसाठी 3349 रूपये भरावे लागणार आहेत. यानंतर संबंधीत ग्राहकाला 36 महिन्यांपर्यत दरमहा 169 रूपयांचे रिचार्ज करावे लागेल. यानंतर 18 महिने झाल्यावर 500 तर 36 महिने झाल्यानंतर 1,000 रूपयांचा परतावा मिळणार आहे. यामुळे ग्राहकाला ए1 इंडियन हा स्मार्टफोन अवघ्या 1,799 तर ए41 पॉवर हे मॉडेल 1,849 रूपयात मिळणार आहे.
कार्बन ए1 इंडियन आणि कार्बन ए 41 पॉवर या दोन्ही स्मार्टफोन्समधील बहुतांश फिचर्स समान आहेत. या दोन्ही मॉडेलमध्ये ४ इंच आकारमानाचा आणि 480 बाय 800 पिक्सल्स म्हणजे डब्ल्यूव्हिजीए क्षमतेचा डिस्प्ले असेल. दोन्हीची रॅम 1 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 8 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. दोन्हीमध्ये गुगल प्ले स्टोअरवरील अॅप वापरण्याची सुविधा असून हे स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहेत. तर यात माय एयरटेल, एयरटेल टिव्ही आणि विंक हे अॅप प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेत. तर ए१ इंडियन या मॉडेलमध्ये १.३ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसर असेल. यातील मुख्य व फ्रंट कॅमेरे अनुक्रमे 3.2 आणि 2 मेगापिक्सल्सचे असतील. तर यात 1,500 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ए41 पॉवर या मॉडेलमध्ये 1.3 गेगाहर्टझ क्वॉ-कोअर प्रोसेसर असून यात 2 आणि 0.3 मेगापिक्सल्सचे कॅमेरे असतील. तर यातील बॅटरी 2300 मिलीअॅम्पिअर क्षमतेची असेल. दोन्ही स्मार्टफोन फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्टने सज्ज असतील. तसेच यात ब्ल्यु-टुथ, जीपीएस, वाय-फाय, एफएम रेडिओ आदी फिचर्स असतील.