Airtel Recharge Hike: एअरटेलने घाम फोडला! मिनिमम रिचार्जचे दर 57 टक्क्यांनी वाढविले; 5G चा फटका?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 07:23 PM2022-11-21T19:23:05+5:302022-11-21T19:23:27+5:30
कंपनीने गेल्या वर्षीदेखील काही निवडक सर्कलमध्ये किमान रिचार्ज 79 रुपयांवरून 99 रुपयांपर्यंत वाढवले होते. आता कंपनी १५५ रुपयांच्या खालील सर्व प्लॅन बंद करू शकते असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
देशात पहिल्यांदा ५जी सेवा सुरु करणाऱ्या टेलिकॉम कंपनीने सामान्यांना घाम फोडला आहे. एअरटेलने कमीतकमी रिचार्ज प्लॅन असलेल्या प्लॅनमध्ये एकाच झटक्यात तब्बल 57 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे २८ दिवसांच्या या ९९ रुपयांच्या प्लॅनवर ग्राहकांना आता १५५ रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या ही दरवाढ हरियाणा आणि ओडिशा या दोन राज्यांत करण्यात आलेली असली तरी देशभरात देखील भविष्यात लागू होण्याची शक्यता आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार एअरटेलने हरियाणा आणि ओडिशाच्या सर्कलमध्ये ९९ रुपयांचा प्लॅन बंद केला आहे. या प्लॅनमध्ये २०० एमबीचा डेटा मिळत होता. तसेच कॉल रेट 2.5 पैसे प्रती सेकंद होता. आता १५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १ जीबी डेटासह ३०० एसएमएस मिळणार आहेत.
ICICI सिक्युरिटीजने ब्रोकरेज नोटमध्ये म्हटले आहे की, भारती एअरटेलने हरियाणा आणि ओडिशा सर्कलमध्ये दर वाढवले आहेत. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून कंपनीने हा धोका पत्करला आहे. हा पॅक 2G ग्राहकांना विकला जात आहे. यामुळे 4G ग्राहकांना काही फरक पडणार नाही. कंपनीने हे मार्केट टेस्टिंगसाठी केले आहे. तिला चांगला प्रतिसाद न मिळाल्यास ती पुन्हा ९९ रुपयांचा प्लॅन आणू शकते.
कंपनीने गेल्या वर्षीदेखील काही निवडक सर्कलमध्ये किमान रिचार्ज 79 रुपयांवरून 99 रुपयांपर्यंत वाढवले होते. आता कंपनी १५५ रुपयांच्या खालील सर्व प्लॅन बंद करू शकते असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.