एअरटेलची धमाकेदार ऑफर, 448 रुपयांत देणार 70 जीबी डेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 05:21 PM2017-11-08T17:21:02+5:302017-11-08T17:25:06+5:30
नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन आणले आहेत. एअरटेल कंपनीकडून प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी हे प्लॅन आहेत. सध्या मोबाइल मार्केटिंगमध्ये चर्चेत असलेल्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने हे प्लॅन लाँच केल्याचे दिसून येते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओने आपले काही प्लॅन महाग केले आहेत, त्यामुळे रिलायन्स जिओचे ग्राहक आपल्याकडे वळविण्यास एअरटेल कंपनीला या प्लॅनचा फायदा होणार आहे.
एअरटेलने Infinity Postpaid च्या माध्यमातून मार्केटमध्ये हा प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. या प्लॅनची सुरुवात 499 रुपयांपासून आहे. यामध्ये इंटरनेट डेटा आणि कॉलिंगसह डिजिटल कॉन्टेंट आणि डिव्हाईस प्रोटेक्शन सुद्धा देण्यात आले आहे. त्यामुळे एअरटेलचा विशेष प्लॅन असल्याचे सांगण्यात येते. 499 रुपयांच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि नॅशनल रोमिंग मिळणार आहे. याशिवाय एसटीडी कॉलिंग सुद्धा पूर्णपणे फ्री आहे. त्याचबरोबर इंटरनेट डेटाच्या बाबतीत पाहिले, तर कंपनीकडून ग्राहकांना 20 जीबी 4जी/3जी डेटा देण्यात येत आहे. सरासरी बघितले, तर इतर मोबाईल कंपन्यांच्या तुलनेत एअरटेल 10 ते 15 जीबी डेटा जास्त देत आहे. डेटा आणि कॉलिंग शिवाय प्लॅनमध्ये दुसरी खाशियत म्हणजे डिव्हाईस प्रोटेक्शन सेवा दिली आहे. याचबरोबर 'एअरटेल सिक्युअर' डिव्हाईस प्रोटेक्शन देण्याचा दावा सुद्धा कंपनीकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, एअरटेलने फक्त पोस्टपेड ग्राहकांसाठी प्लॅन लाँच केला नाही, तर प्रीपेड ग्राहकांसाठी सुद्धा प्लॅन आणला आहे. हा प्लॅन 448 रुपयांचा असून यामध्ये फ्री अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा देण्यात आली आहे. तसेच 70 जीबी इंटरनेट डेटा देण्यात आला आहे. दरम्यान, डेटा अॅक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांनी एअरटेलच्या माय अॅपचा वापर करु शकतात.