अल्काटेल ए5 एलईडी, ए7 : जाणून घ्या सर्व फिचर्स
By शेखर पाटील | Published: November 10, 2017 09:59 AM2017-11-10T09:59:16+5:302017-11-10T10:01:26+5:30
अल्काटेल कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी ए५ एलईडी आणि ए७ हे दोन स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली असून हे दोन्ही मॉडेल अमेझॉनवरून उपलब्ध करण्यात आले आहेत.
अल्काटेल ए5 एलईडी हा स्मार्टफोन या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करण्यात आला होता. तर अल्काटेल ए7 या मॉडेलचं आयएफए-2017मध्ये अनावरण करण्यात आलं. हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना अनुक्रमे 12 हजार 999 आणि 13 हजार 999 रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील अल्काटेल ए5 एलईडी हा स्मार्टफोन मॉड्युलर या प्रकारातील आहे. अर्थात यात युजर हव्या त्या पध्दतीने बदल करू शकतो. याच्या मागील बाजूच्या कव्हरवर अतिशय आकर्षक असं एलईडी लाईट्स लावण्यात आले आहेत. नोटिफिकेशन्स आल्यावर हे लाईट रंग बदलतात. हे कव्हर बदलून वापरण्याची सुविधा युजरला प्रदान करण्यात आली आहे. यासाठी लाईटअप मॉड प्लस आणि स्वतंत्र स्मार्टफोन अॅप सादर करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून युजरला कस्टमायझेशनची सुविधा देण्यात आली आहे. यात 5.2 इंच आकारमानाचा आणि 1280 बाय 720 पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोअर मीडियाटेक एमटी 6763 प्रोसेसरने सज्ज असेल. याची रॅम 3 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा आहे.
यातील मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सल्सचा असून यात ड्युअल टोन एलईडी फ्लॅश आणि एफ/2.0 अपार्चर असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात फिक्स्ड फोकस आणि एलईडी फ्लॅशयुक्त 5 मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यातील बॅटरी 3100 मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारा असेल.
अल्काटेल ए7 या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा (1920 बाय 1080 पिक्सल्स) डिस्प्ले असेल. याची रॅम 4 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 32 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यात ड्युअल टोन एलईडी फ्लॅशसह मुख्य कॅमेरा 16 मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल्सचा असेल. तर यातील बॅटरी 4,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हा स्मार्टफोनही अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारा आहे.
अल्काटेल ए5 एलईडी व ए4 हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना अनुक्रमे 12 हजार 999 आणि तेरा हजार 999 रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील अल्काटेल ए5 एलईडी या स्मार्टफोनला संलग्न करण्यास सक्षम असणारा लाईटअप मॉड प्लसचे मूल्य 3 हजार 999 रूपये आहे. मात्र प्रारंभी ग्राहकांना हे मॉड मोफत देण्यात येत आहे. तर अल्काटेल ए7 या स्मार्टफोनसह प्रारंभी 2 हजार 499 रूपये मूल्य असणारा टिसीएल मुव्हबँड मोफत देण्यात येत आहे.