अलेक्झा असिस्टंटयुक्त वायरलेस इयरबडस्
By शेखर पाटील | Published: February 26, 2018 07:24 PM2018-02-26T19:24:45+5:302018-02-26T19:24:45+5:30
जॅब्रा कंपनीने अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटने सज्ज असणारे एलीट ६५ टी हे वायरलेस इयरबडस् बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
जॅब्रा कंपनीने अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटने सज्ज असणारे एलीट ६५ टी हे वायरलेस इयरबडस् बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
जॅब्राने आधीच भारतीय ग्राहकांसाठी एलीट स्पोर्टस् हे वायरलेस इयरबडस् लाँच केले आहे. यानंतर आता एलीट ६५ टी हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे अर्थातच अमेझॉनने विकसित केलेला अलेक्झा हा डिजीटल असिस्टंट होय. या असिस्टंटला ध्वनी आज्ञावली म्हणजे व्हाईस कमांडच्या मदतीने कार्यान्वित करता येते. याशिवाय यात सिरी आणि गुगल असिस्टंट या अनुक्रमे अॅपल आणि गुगलच्या व्हाईस असिस्टंटचाही सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने संगीत प्ले करणे, आवाज कमी-जास्त करणे, म्युझिक ट्रॅक बदलणे आदी फंक्शन्स पार पाडता येतात. याशिवाय, याला कनेक्ट असणार्या स्मार्टफोनवरून कॉल करणे वा रिसीव्ह करणे आदी बाबीदेखील याच्या मदतीने शक्य आहेत. जॅब्रा साऊंड प्लस या अॅपच्या मदतीने या मॉडेलचा अतिशय उत्तम प्रकारे वापर करता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १५ तासांपर्यंत वापरता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे इयरबडस् वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असून याला दोन वर्षांची वॉरंटी प्रदान करण्यात आली आहे. सध्या हे इयरबडस् टिटॅनियम ब्लॅक या रंगाच्या पर्यायात ग्राहकांना १२,९९९ रूपये मूल्यात अमेझॉन इंडिया या पोर्टलसह क्रोमा स्टोअर्समधून उपलब्ध करण्यात आले आहेत.