Coronavirus : अॅमेझॉन कंपनीने 10 लाखांहून अधिक प्रॉडक्ट्स हटविले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 03:01 PM2020-03-04T15:01:20+5:302020-03-04T15:08:21+5:30
Coronavirus: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत.
नवी दिल्ली : चीनमधील कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरससंबंधी दिशाभूल किंवा भ्रामक दावा करण्यात येणारे 10 लाखांहून अधिक प्रॉडक्ट्स अॅमेझॉन कंपनीने हटविले आहेत. तसेच, ग्राहकांकडून चुकीच्या पद्धतीने पैसे वसूल करण्यात येत असल्याचा आरोप होता, त्या थर्ड-पार्टी मर्चेंट्सच्या हजारो ऑफर्स सुद्धा कंपनीने रद्द केल्या आहेत. CNBCसोबत बोलताना कंपनीने यासंदर्भात माहिती दिली.
कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, अॅमेझॉनवर कोणत्याही प्रॉडक्ट्साठी चुकीची किंमत वसूल करणाऱ्यांसाठी कोणतीच जागा नाही आहे. उचित मूल्य निर्धारण विषयीचे आमचे दीर्घकालीन धोरण स्पष्टपणे सांगते की, आम्ही ग्राहकांच्या आत्मविश्वासाला हानी पोहचविणाऱ्या किंमतींना परवानगी देत नाही, असेही कंपनीने म्हटले आहे.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन कंपनीने असेही म्हटले आहे की, कंपनी प्लॅटफॉर्मवर नजर ठेवेल आणि किंमती वाढविण्याच्या धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या ऑफर्स काढून टाकेल. तसेच, कोरोना व्हायरससंबंधी भ्रामक किंवा दिशाभूल करणार्या वस्तूंची विक्री करणारे अकाउंट्स देखील निलंबित केली जातील किंवा पूर्णपणे काढून टाकली जातील.
याशिवाय अॅमेझॉन कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर कोरोना व्हायरस, COVID-19, n95 मास्क आणि यांसारखे संबंधीत सर्चेसमध्ये एक नोटीस अॅड केली आहे. जे रोगाचा प्रतिबंध आणि उपचार याविषयी अधिक माहितीसाठी युजर्संना सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन वेबसाइटवर घेऊन जात आहे.
दरम्यान, अॅमेझॉन सुद्धा त्या टेक कंपन्यांपैकी एक आहे. ज्या कंपन्यांची फेब्रुवारी महिन्यात कॅलिफोर्नियातील फेसबुकच्या मेनलो पार्कमध्ये जागतिक आरोग्य संघटनेसोबत (WHO) बैठक झाली होती. या बैठकीत कोरोना व्हायरससंबंधी चुकीची माहिती टाळण्यासंबंधीची चर्चा झाली होती.
सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. भारतात 25 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.
चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(Coronavirus: मोबाईल वापरता? मग कोरोनापासून जरा जास्तच सावध राहा; कारण...)
(Coronavirus: भारतात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी होणार, विमानतळावरच कॅम्प)
(कोरोनाच्या काळजीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा!)