अॅमेझॉनचे व्हॉईस कमांडवर चालणारे टॅबलेट
By शेखर पाटील | Published: September 10, 2018 10:56 AM2018-09-10T10:56:56+5:302018-09-10T10:59:12+5:30
अॅमेझॉनने अलेक्झाच्या व्हॉईस कमांडवर चालणारे दोन टॅबलेट ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
अॅमेझॉनने अलेक्झाच्या व्हॉईस कमांडवर चालणारे दोन टॅबलेट ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. सध्या डिजिटल व्हर्च्युअल असिस्टंट तुफान लोकप्रिय झालेले आहेत. याला व्हाईस कमांड अर्थात ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने कार्यान्वित करता येते. स्मार्टफोनसह अन्य स्मार्ट उपकरणांमध्ये या प्रकारातील असिस्टंटची सुविधा देण्यात आली असून ही प्रणाली लोकप्रिय झाली आहे. विशेष करून अलिकडेच स्मार्ट स्पीकरकडे युजर्सचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. आता स्मार्ट स्पीकरप्रमाणे फक्त आणि फक्त व्हाईस कमांडवर चालणारे टॅबलेट बाजारपेठेत दाखल झाले आहेत. याला अॅमेझॉन कंपनीने लाँच केले आहे. फायर एचडी 8 आणि फायर एचडी 8 किड या नावाने हे मॉडेल्स सादर करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत बहुतांश टॅबलेटमध्ये टचस्क्रीन डिस्प्ले दिलेला असतो. या दोन्ही मॉडेल्समध्येही याच प्रकारातील डिस्प्ले असला तरी यासोबत याला अलेक्झाचा सपोर्ट दिलेला आहे. म्हणजेच यावरील सर्व फंक्शन्स हे ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने कार्यान्वित करता येतात. युजरला एखादे टूल वापरायचे असल्यास तो याबाबतची व्हॉईस कमांड देऊन याचा वापर करू शकतो. यामध्ये एखादे गाणे सुरू किंवा पॉज करण्यासह ध्वनीची तीव्रता कमी-जास्त करण्याची सुविधा आहे. याच प्रकारे व्हिडीओचे सर्व नियंत्रण यात देण्यात आलेले आहे. याशिवाय यात स्मार्ट होमचे नियंत्रण, व्हिडीओ कॉल्स आदींची सुविधाही देण्यात आलेली आहे.
अॅमेझॉनने शो मोड हे स्वतंत्र फिचरदेखील दिलेले आहे. यात ट्रेंडींग न्यूज, व्हिडीओज, चित्रपटांचे ट्रेलर्स, हवामानाचे अलर्ट आदींचा एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. यातील ड्युअल स्पीकर हे डॉल्बी डिजीटल प्लस आणि डॉल्बी अॅटमॉस या तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. उर्वरित फिचर्सचा विचार करता, यामध्ये 8 इंच आकारमानाचा व एचडी (1280 बाय 800 पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले दिला आहे. याची रॅम 1.5 जीबी व इनबिल्ट स्टोअरेज 16/32 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. यातील मुख्य कॅमेरा 2 मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा एचडी क्षमतेचा असणार आहे.
दरम्यान, अॅमेझॉनने एचडी 8 किडस हे मॉडेलही लाँच केले आहे. नावातच नमूद असल्यानुसार यात मूळ मॉडेल्समधील सर्व फिचर्ससह खास मुलांसाठी काही सुविधा देण्यात आल्या आहेत. याचा आकार हा बालकांना आकर्षक वाटेल अशा प्रकारचा आहे. हा डिस्प्ले अतिशय मजबूत असाच आहे. यात बालकांसाठीचे ई-बुक्स, शैक्षणिक व्हिडीओज आदींचा मर्यादीत कालखंडासाठी मोफत अॅक्सेस देण्यात आला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या टॅबलेटवर पालकांच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र सुविधा देण्यात आली आहे. अॅमेझॉन एचडी 8 आणि एचडी 8 किडस् हे मॉडेल अनुक्रमे 79.99 आणि 129.99 डॉलर्स मूल्यात बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहेत.