Amazon नं भारतात लाँच केलं Smart Stores; आता लोकल दुकानं होणार डिजिटल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 11:34 PM2020-06-26T23:34:33+5:302020-06-26T23:38:40+5:30
ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांसाठी (रिटेलर्स) स्मार्ट स्टोअर्स (Smart Stores) लाँच करण्यात आले आहे. याद्वारे, किरकोळ स्टोअर्स ऑनलाइन पेमेंट घेऊ शकतील.
Amazon कंपनीने भारतात आपल्या पेमेंट सर्व्हिस Amazon Pay चा विस्तार वाढविला आहे. ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांसाठी (रिटेलर्स) स्मार्ट स्टोअर्स (Smart Stores) लाँच करण्यात आले आहे. याद्वारे, किरकोळ स्टोअर्स ऑनलाइन पेमेंट घेऊ शकतील. हे पूर्णपणे कॉन्टॅक्टलेस पेमेंट असणार आहे. यासाठी स्थानिक दुकानांना साइन अप करावे लागेल. या सेवेद्वारे ग्राहक जवळच्या दुकानात जाऊन क्यूआर कोड स्कॅन करतील, त्यानंतर त्या दुकानात विकल्या जाणाऱ्या सर्व वस्तू किंवा मालाची माहिती त्यांना फोनवर मिळणार आहे.
भारतासाठी Amazonने स्मार्ट स्टोअर नावाने ही सर्व्हिस सुरु केली आहे. कंपनी किरकोळ स्टोअरमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्राम प्रोव्हाईड करेल, जेणेकरून ते त्यांच्या दुकानातील डिजिटल लॉग बनवून ठेवतील. हे पेटीएम आणि फोन पे पेक्षा वेगळे काम करेल. दरम्यान, याठिकाणी सुद्धा ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांना क्यूआर कोड दिला जाईल. जेणेकरून ते त्यांच्या दुकानासमोर पेमेंट स्थापित करु शकतील. हा क्यूआर कोड Amazon अॅपवर स्कॅन करावा लागेल.
दुकानासमोरील Amazon स्मार्ट स्टोअरचा क्यूआर कोड स्कॅन करून ग्राहकांना या दुकानात कोणता माल उपलब्ध आहे, तेही दिसेल. याशिवाय, ऑफर्सची माहितीही याठिकाणी मिळेल. अॅपमधूनच, आपण खरेदी करू इच्छित असलेल्या दुकानातील साहित्य निवडू शकता आणि थेट पेमेंट करू शकता. तसेच, ग्राहकांच्या रिव्यूसाठी एक पर्याय देखील असणार आहे. याठिकाणी आपल्याला संबंधित वस्तूंबद्दल किंवा त्या वस्तूंवर असलेल्या सवलतीच्या ऑफरबद्दल माहिती असेल.
वस्तू निवडल्यानंतर ग्राहकांना Amazon Pay सह इतर पेमेंट अॅप्समधून पैसे ट्रान्सफर करण्याचा पर्याय मिळेल. आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्डसह यूपीआय आयडीचा वापर करुन याठिकाणी पेमेंट करु शकता. या सर्व्हिसचा फायदा ग्राहक आणि दुकानदार दोघांनाही होईल, असे Amazonचे म्हणणे आहे. कारण ग्राहकांना वस्तू निवडण्यासाठी दुकानात जाण्याची गरज भासणार नाही आणि यामुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन देखील होईल. अशा प्रकारे खरेदी केल्यावर कंपनी ग्राहकांना रिवॉर्ड सुद्धा देणार आहे. Amazonच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या खरेदी दरम्यान ग्राहक Amazon Pay Later चा पर्यायही वापरू शकतात.