Amazon मध्ये कर्मचारी कपातीचा दुसरा राऊंड, तब्बल ९ हजार लोकांची नोकरी जाणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 10:39 PM2023-03-20T22:39:09+5:302023-03-20T22:40:45+5:30
Amazon Layoff 2023: यंदाच्या वर्षात क्वचितच असा दिवस असेल की ज्या दिवशी एखाद्या बड्या कंपनीनं नोकर कपातीची घोषणा केली नसावी.
Amazon Layoff 2023: यंदाच्या वर्षात क्वचितच असा दिवस असेल की ज्या दिवशी एखाद्या बड्या कंपनीनं नोकर कपातीची घोषणा केली नसावी. आता Amazon या दिग्गज कंपनीनं घोषणा केलीय की येत्या काही आठवड्यात कंपनीत काम करणाऱ्या ९ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात येणार आहे.
Amazon मधील दुसऱ्या फेरीच्या नोकर कपातीची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ अँडी जॅसी यांनी एका मेमोमध्ये दिली आहे. माहिती देताना कंपनीचे सीईओ म्हणाले की, कंपनीची वार्षिक नियोजन प्रक्रिया या महिन्यात पूर्ण होईल आणि त्यानंतर पुन्हा कपातीची दुसरी फेरी सुरू होईल. यासोबतच कंपनी काही मोक्याच्या क्षेत्रात नवीन भरती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Amazon Layoff मुळे कुणावर होणार परिणाम
मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, AWS व्यतिरिक्त, जाहिरात आणि Twitchमध्ये नोकर कपातीचा परिणाम दिसून येईल. म्हणजेच या विभागांमध्ये काम करणाऱ्या लोकांना या वेळी कर्मचारी कपातीचा फटका बसणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी कंपनी कर्मचारी कपातीसाठीचा मोठा निर्णय घेत असल्याचे बोलले जात आहे.
जानेवारी महिन्यात १८ हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
जानेवारी २०२३ मध्ये Amazon ने १८ हजार लोकांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता आणि आता पुन्हा एकदा कंपनी मोठ्या प्रमाणावर लोकांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे. याआधी फेसबुकच्या मूळ कंपनी मेटाने देखील स्पष्ट केले आहे की यावर्षी १०,००० लोक त्यांच्या नोकऱ्या गमावतील. यापूर्वी मेटामध्ये ११ हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.