अमेझॉन पे लवकरच युपीआयशी होणार संलग्न
By शेखर पाटील | Published: November 3, 2017 11:04 AM2017-11-03T11:04:20+5:302017-11-03T11:04:42+5:30
अमेझॉन पे ही डिजीटल पेमेंट सिस्टीम लवकरच केंद्र सरकारच्या युपीआय या प्रणालीशी संलग्न होणार असल्याचे वृत्त असून याची सध्या चाचणी सुरू आहे.
केंद्र सरकारच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआयवर आधारित पेमेंट सिस्टीम्सची लोकप्रियता वाढू लागल्याचे दिसून येत आहे. आता बहुतांश कंपन्या युपीआयवर आधारित पेमेंट सिस्टीम्सला प्राधान्य देत आहेत. देशातील ५० पेक्षा जास्त सरकारी व खासगी बँकांनी या प्रणालीचा अवलंब केला आहे. तसेच फ्लिपकार्टची मालकी असणारे फोनपे, गुगलचे खास भारतीयांसाठी सादर करण्यात आलेले तेज अॅप, पेटीएम, उबर आदींच्या पेमेेंट सिस्टीमध्येही युपीआयचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. तर व्हाटसअॅपदेखील याची चाचणी घेत आहे. भारतात युपीआयवर आधारित व्यवहारांची संख्या वाढत आहे. सप्टेबर-२०१७मध्ये युपीआयवर आधारित व्यवहारांमध्ये तब्बल ८५ टक्के वाढ होत ३ कोटी व्यवहार झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर आता अमेझॉन पे या प्रणालीतही याचा वापर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले असून ताज्या वृत्तानुसार याची चाचणीदेखील सुरू करण्यात आली आहे.
अमेझॉन कंपनीने भारतावर जाणीवपूर्व लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. खुद्द अमेझॉनने ई-कॉमर्सच्या क्षेत्रात आघाडी घेतली असून आता अन्य उत्पादनेही भारतात आक्रमकपणे लाँच करण्यात येत आहेत. याचप्रमाणे अमेझॉन पे ही प्रणालीदेखील भारतात जोरदार पध्दतीने प्रमोट करण्याचा या कंपनीचा मानस असल्याचे दिसून येत आहेत. या अनुषंगाने अलीकडेच अमेझॉन पे मध्ये तब्बल १,६०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यामुळे आता या सेवेचा विस्तार होणार असून याचमुळे युपीआयशी संलग्नता घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.