भारतीयांसाठी खास अॅमेझॉन अलेक्झा अॅप
By शेखर पाटील | Published: November 1, 2017 11:57 AM2017-11-01T11:57:17+5:302017-11-01T14:11:10+5:30
अमेझॉन कंपनीने काही दिवसांपूर्वी जाहीर केल्यानुसार आपले अलेक्झा अॅप हे भारतीय युजर्ससाठी सादर केले असून यात हिंग्लीश भाषेच्या आज्ञावलीचा सपोर्ट देण्यात आला आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अमेझॉन कंपनीने भारतात आपल्या इको या ध्वनी आज्ञावलीवर चालणार्या स्मार्ट स्पीकरची श्रुंखला तसेच अलेक्झा हा व्हर्च्युअल असिस्टंट सादर करण्याची घोषणा केली होती. आता लवकरच अमेझॉन इको स्पीकर प्रत्यक्षात ग्राहकांना मिळणार असून या पार्श्वभूमीवर अलेक्झा अॅपदेखील सादर करण्यात आले आहे. अॅपलचे अॅप स्टोअर आणि गुगल प्ले वरून कुणीही अनुक्रमे आयओएस आणि अँड्रॉइड प्रणालीसाठी याला इन्स्टॉल करू शकतो. खरं तर अमेझॉनचा अलेक्झा हा व्हर्च्युअल असिस्टंट अमेरिकेसह अन्य देशांमधील कोट्यवधी युजर्स वापरतात. तथापि, भारतात याला सादर करतांना आवश्यक ते बदल करण्यात आल्याची माहिती या कंपनीतर्फे देण्यात आली आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे हिंग्लीश भाषेचा सपोर्ट होय. देशात एक खूप मोठा वर्ग इंग्रजी मिश्रीत हिंदीत बोलतो. विशेष करून तरूणाई तर याच भाषेत संवाद साधत असते. यामुळे अलेक्झाला आता याच भाषेत आज्ञावली देता येणार आहे.
अलेक्झाला हिंग्लीश भाषेतील शब्द, विविध उत्पादने आदींना समजून त्यावर कार्यान्वयन करण्याचे तंत्र प्रदान करण्यात आले आहे. यात भारताशी संबंधीत अनेक बदल करण्यात आले आहे. यात स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आदींसह दिवाळ, होळी, दसरा आदी सणांबाबतच्या माहितीचा समावेश आहे. याच्या जोडीला भारतीय खाद्यसंस्कृती, दैनंदिन जीवनातील बाबींची माहितीदेखील यात देण्यात आली आहे. खरं तर, अमेझॉन अलेक्झा अॅप लवकरच हिंदीत येणार असल्याचे संकेत आधीच मिळाले आहेत. याआधी हिंग्लीशीचा सपोर्ट असणार्या स्थितीत लाँच करून नंतर यात सुधारणा करण्याचा मार्ग अमेझॉनने पत्करला असल्याचे यातून दिसून येत आहे. अर्थात भारतीय बाजारपेठेत गुगलचा गुगल असिस्टंट आणि अॅपलच्या सिरीला अमेझॉन अलेक्झा टक्कर देण्यासाठी उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.