खास भारतीयांसाठी अमेझॉनचे वेब ब्राऊजर
By शेखर पाटील | Published: April 18, 2018 03:13 PM2018-04-18T15:13:48+5:302018-04-18T15:13:48+5:30
अमेझॉनने भारतीय युजर्ससाठी 'इंटरनेट : फास्ट, लाईट अँड प्रायव्हेट' या नावाने नवीन अँड्रॉइड वेब ब्राऊजर सादर केले असून ते अतिशय गतीमान आणि वापरण्यासाठी सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अमेझॉनने भारतीय युजर्ससाठी 'इंटरनेट : फास्ट, लाईट अँड प्रायव्हेट' या नावाने नवीन अँड्रॉइड वेब ब्राऊजर सादर केले असून ते अतिशय गतीमान आणि वापरण्यासाठी सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अमेझॉनने काही दिवसांपूर्वी आपल्या किंडल या अॅपची लाईट आवृत्ती भारतीय युजर्सला सादर केली होती. आता याच पध्दतीने भारतीय युजर्ससाठी 'इंटरनेट : फास्ट, लाईट अँड प्रायव्हेट' या नावाने नवीन वेब ब्राऊजर सादर केले आहे. याबाबत कोणताही गाजावाजा करण्यात आलेला नाही. यामुळे हे अॅप अद्याप प्रयोगात्मक अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. हे ब्राऊजर अँड्रॉइडच्या युजर्ससाठी सादर करण्यात आले असून ते गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध केलेले आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे ब्राऊजर वेगवान, हलके आणि वापरण्यासाठी सुरक्षित असल्याचे दर्शविण्यात आले आहे. या अॅपचा आकार २.४ मेगाबाईट आहे. यामुळे ते पटकन इन्स्टॉल करणे शक्य आहे. यावरून गतीमान पध्दतीने वेब ब्राऊजींग करता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात सुरक्षेला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.
अलीकडच्या काळात इंटरनेटवरील सुरक्षा हा सर्वात महत्वाचा मुद्दा बनला आहे. विविध सोशल साईटकडून युजर्सची गोपनीय माहिती लीक होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. यातच विविध वेब ब्राऊजर्सदेखील युजर्सची गोपनीय माहिती जमा करून ती जाहिरातदारांना विकत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर, अमेझॉनचे हे ब्राऊजर युजरची कोणताही माहिती ट्रॅक करत नसल्याचा अमेझॉनचा दावा असून ही बाब अॅपच्या विवरणामध्ये नमूद करण्यात आली आहे. यासाठी कोणत्याही एक्स्ट्रा परमिशन्सदेखील मागितल्या जात नाहीत. आणि यात प्रायव्हेट टॅब्जची सुविधादेखील देण्यात आली आहे. याचा इंटरफेस हा अतिशय सुलभ आणि सर्वसामान्यांना समजणारा आहे. यावर अॅड्रेस बारच्या खाली मनोरंजन, क्रीडा, वृत्त आदी विविध विभाग देण्यात आले आहेत. हे अॅप अँड्रॉइडच्या ५.० वा त्यावरील आवृत्त्यांच्या युजर्सला वापरता येणार आहे. सध्या सर्व अँड्रॉईड युजर्सला हे वापरता येत नाही. तथापि, येत्या दिवसांमध्ये सर्व हँडसेटशी याला सुसंगत केले जाण्याची शक्यता आहे. गुगलचे क्रोम, मोझिलाचे फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्टचे एज आणि अॅपलचे सफारी या वेब ब्राऊजर्सला अमेझॉनचे हे ब्राऊजर आव्हान देणार का? याबाबत आता उत्सुकतेचे वातावरण निर्मित झाले आहे.
'इंटरनेट : फास्ट, लाईट अँड प्रायव्हेट' ब्राऊजरची डाऊनलोड लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.amazon.cloud9.garuda