केवळ १० लाखांत मिळणार कृत्रिम हृदय!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 09:31 AM2023-05-10T09:31:04+5:302023-05-10T09:35:40+5:30
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क । अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. आता अत्यंत महागडे उपचार किफायतशीर दरात करणे शक्य झाले आहे. आयआयटी कानपूरनेही आजवरचे सर्वात स्वस्त कृत्रिम हृदय विकसित केले आहे. आयआयटी कानपूरची प्रयोगशाळा आणि हैदराबादमधील एका कंपनीत सध्या याच्या चाचण्या प्राण्यांवर सुरू आहेत. यातील निष्कर्ष समाधानकारक असले तर पुढील दोन वर्षात मानवावर या हृदययंत्राचे प्रत्यारोपण करणे शक्य होणार आहे.
सध्या कसे काम करणार?
याला हृदयाच्या एका भागापासून दुसऱ्या भागाला जोडले जाते. यातून संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणे शक्य होणार आहे.
याचे डिझाइन कॉम्प्युटर सिमुलेशनच्या साहाय्याने तयार केले आहे.
जपानी मेग्लेव ट्रेनमधील तंत्रज्ञानाप्रमाणे हे डिव्हाइस रक्ताच्या थेट संपर्कात येत नाही. या पंपच्या आतील भागात टायटेनियमचे डिझाइन हुबेहूब रक्तवाहिन्यांप्रमाणे बनविण्यात आले आहे.
ज्यांच्या शरीरातील हृदय वाहिन्यांमध्ये रक्त योग्य दाबाने ढकलू शकत नाही अशांना कृत्रिम हृदय हे जीवनदायी ठरू शकते.
चार्जिंग करता येणार
मानवी हृदयाला शरीरातील इलेक्ट्रिकल फिल्डमधून सतत ऊर्जा मिळत असते. परंतु कृत्रिम हृदयाला मात्र बाहेरून ऊर्जा पुरविली जाणार आहे. हे हृदययंत्र शरीरात बसविल्यानंतर त्याच्या चार्जिंगसाठी त्यातून एक तार बाहेर काढण्यात येणार आहे. चार्जिंग करताना कमीत कमी आवाज आणि उष्णता निर्माण होईल, याची दक्षता घेतली जाणार आहे.
२५ कोटींची गुंतवणूक
बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या कृत्रिम हृदयांची किंमत किमान २५ लाख ते एक कोटींच्या घरात आहे. परंतु आयआयटी कानपूरने विकसित केलेले हृदययंत्र केवळ १० लाखांमध्ये उपलब्ध असणार आहे.
हे विकसित करण्यासाठी आतापर्यंत ३५ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. याचा आकार एका पाइपसारखा असेल.
हे कृत्रिम हृदय टायटॅनियम या धातूपासून बनविलेले आहे. वैद्यकीय भाषेत याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस असे म्हटले जाते.