आता वायरलेस पद्धतीनं वापरता येणार अँड्रॉइड ऑटो !
By शेखर पाटील | Published: January 2, 2018 12:38 PM2018-01-02T12:38:07+5:302018-01-02T12:39:02+5:30
अलीकडच्या काळात बहुतांश कारमध्ये असणारी अँड्रॉइड ऑटो प्रणाली लवकरच वायरलेस पध्दतीत वापरणे शक्य होणार आहे.
अलीकडच्या काळात बहुतांश कारमध्ये असणारी अँड्रॉइड ऑटो प्रणाली लवकरच वायरलेस पध्दतीत वापरणे शक्य होणार आहे. कारच्या विविध मॉडेल्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून इन्फोटेनमेंट प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. यात संबंधीत प्रणालीला स्मार्टफोन कनेक्ट करता येते. याच्या माध्यमातून दिशादर्शनासह (नेव्हिगेशन) मनोरंजनाचा आनंद घेता येतो. मात्र अँड्रॉइड ऑपरेटींग सिस्टीमला परिपूर्ण प्रकारे कारमध्ये वापरायचे असल्यास याला अनेक मर्यादादेखील आहेत. या अनुषंगाने अँड्रॉइड ऑटो प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जगातील बहुतांश कार उत्पादकांनी याचा अंगिकार करण्यास प्रारंभ केला आहे. सध्या अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले या दोन अनुक्रमे अँड्रॉइड व आयओएस प्रणालींवर आधारित सिस्टीम्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आजवर अँड्रॉइड ऑटो प्रणाली वापरण्यासाठी युजरला आपला स्मार्टफोन मायक्रो-युएसबीच्या मदतीने संबंधीत उपकरणाला कनेक्ट करावा लागत आहे. सध्या अॅपल कार प्ले वायरलेस पध्दतीने वापरता येते असले तरी अँड्रॉइड ऑटोसाठी ही सुविधा नाही.
वास्तविक पाहता गुगलने गेल्या वर्षी झालेल्या आपल्या आय/ओ परिषदेतच अँड्रॉइड ऑटो प्रणाली वायरलेस पध्दतीने सादर करण्यात येईल याचे सूतोवाच केले होते. नंतर मात्र याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. या पार्श्वभूमिवर, जेव्हीसी केनवुड या कंपनीने वायरलेस अँड्रॉइड ऑटो प्रणाली सादर करण्याचे संकेत दिले आहेत. पुढील आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या सीईएस-२०१८मध्ये याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मात्र या आधीच संबंधीत प्रणालीची माहिती समोर आली आहे. यानुसार कोणत्याही केबल कनेक्टीव्हिटीविना आता स्मार्टफोनवरील विविध फंक्शन्स यावर वायरलेस पध्दतीने वापरता येतील. ही कंपनी दोन उपकरणे सादर करणार असून यात एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा टचस्क्रीन डिस्प्ले असेल. विशेष म्हणजे यात अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले या दोन्ही प्रणालींचा सपोर्ट असेल. अर्थात या दोन्ही प्रणालींवर चालणारे स्मार्टफोन्स याला वायरलेस पध्दतीने कनेक्ट करून वापरता येतील.