अँड्रॉइड ‘ओ’चे झाले नामकरण; ओरिओच्या नावाने ओळखली जाणार आवृत्ती !
By शेखर पाटील | Published: August 22, 2017 07:30 AM2017-08-22T07:30:26+5:302017-08-22T10:27:25+5:30
गेल्या अनेक महिन्यांपासून अँड्रॉइड ८.० अर्थात ‘ओ’ ही आवृत्ती नेमकी कोणत्या नावाने ओळखली जाणार याच्या उत्सुकतेला आता पूर्णविराम मिळाला असून याला ओरिओ हे नाव मिळाल्याचे मध्यरात्री अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
जगातील क्रमांक एकची स्मार्टफोन ऑपरेटींग सिस्टीम म्हणून अँड्रॉइड ओळखली जाते. मुक्तस्त्रोताचा उल्लेख आल्याबरोबर सर्वप्रथम अँड्रॉईडच आपल्या डोळ्यासमोर येते. २०१७च्या प्रारंभी अँड्रॉइड ओ या आवृत्तीचा पहिला प्रिव्ह्यू जगासमोर सादर करण्यात आला होता. यानंतर मे महिन्यात झालेल्या गुगलच्या आय/ओ परिषदेत या प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून जगभरातील डेव्हलपर्सला बीटा म्हणजेच प्रयोगात्मक स्थितीत सादर करण्यात आले होते. गुगल पिक्सल फोन, गुगल पिक्सल एक्सएल, गुगल पिक्सल सी, गुगल नेक्सस ६ पी, गुगल नेक्सस ५ एक्स आणि नेक्सस प्लेअर या मॉडेल्समध्येच ही प्रणाली वापरता येत होती. यानंतर याचे विविध प्रिव्ह्यू लाँच करण्यात आले. यानंतर अखेर सूर्यग्रहणाच्या दिवशी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी ही प्रणाली अधिकृतपणे जगासमोर सादर करण्यात आली. अँड्रॉइड ओ आवृत्तीचे सर्व फिचर्स आधीच सादर करण्यात आले असले तरी याचे नाव मात्र अद्याप जाहीर करण्यात आले नसल्यामुळे याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागली होती. अखेर याला ओरिओ हे नाव देण्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे याबाबत सुरू असणार्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
ओरिओ हे विशिष्ट प्रकारचे बिस्कीट आहे. यात चॉकलेटच्या दोन चीप्समध्ये गोड क्रीम भरलेले असते. एका अर्थाने हे चॉकलेट सँडविच कुकीज म्हणूनही ओळखले जाते. जगातल्या बहुतांश देशांमध्ये ओरिओ हा ब्रँड विख्यात आहे. यातच आता अँड्रॉइड ओ या आवृत्तीला याचे नाव मिळाल्यानेही तो पुन्हा एकदा चर्चेत येणार हे नक्की.
नावातील ‘गोडवा’
आजवर अँड्रॉइड प्रणालीच्या विविध आवृत्त्यांना जगाच्या विविध भागात लोकप्रिय असणारे मिष्ट पदार्थ, मिठाई, चॉकलेटस, पेय, झेडर्टस् आदींवरून नावे ठेवण्यात आली आहेत. यात इंग्रजीतील अल्फाबेटनुसार पहिल्या दोन आवृत्तींना अल्फा आणि बीटा नाव देण्यात आले. मात्र यानंतर कपकेक (आवृत्ती १.५), डोनट (१.६), एक्लेअर्स (२.० व २.१), फ्रोयो (२.२ आणि २.२.३) जिंजरब्रेड (२.३ आणि २.३.७) हनीकोंब (३.० आणि ३.२.६) आईसक्रीम सँडविच (४.० आणि ४.०.४), जेली बीन (४.१ आणि ४.३.१), किटकॅट (४.४-४.४.४ आणि ४.४ डब्ल्यू-४डब्ल्यू.२), लॉलिपॉप (५.० आणि ५.१), मार्शमॅलो (आवृत्ती ६.०) आणि अँड्रॉईड ७.० या आवृत्तीला नोगट हे नाव देण्यात आले होते. तर आता अँड्रॉइड ओ म्हणजेच ८.० ही आवृत्ती ओरिओ या नावाने ओळखली जाणार आहे.