मोटो जी ५ एस आणि मोटो जी५ एस प्लसची घोषणा
By शेखर पाटील | Published: August 2, 2017 05:00 PM2017-08-02T17:00:48+5:302017-08-02T17:00:54+5:30
मोटोरोला कंपनीने मोटो जी ५ एस आणि मोटो जी५ एस हे मध्यम किंमतपट्टयातील स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
काही महिन्यांपुर्वीच मोटोरोला मोबिलिटी या कंपनीने मोटो जी ५ आणि मोटो जी ५ प्लस हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. आता याच्याच पुढील आवृत्त्या मोटो जी ५ एस आणि मोटो जी५ एस या मॉडेलच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आधीच्या मॉडेल्सपेक्षा यामध्ये मोठा डिस्प्ले, उत्तम दर्जाची बॅटरी तसेच अन्य महत्वाचे फिचर्स आहेत.
मोटो जी ५ एस या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. यात ऑक्टॉ-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर आहे. याची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे अनुक्रमे १६ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे आहेत. तर यात रॅपीड चार्जरसह ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइड ७.१.१ नोगट आवृत्तीवर चालणारे आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर असून यात वाय-फाय, ब्ल्यू-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी, युएसबी टाईप-सी, ऑडिओ जॅक, फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट आदी फिचर्स असतील. जागतिक बाजारपेठेत याचे मूल्य २४९ युरो म्हणजेच सुमारे १८,५०० रूपये इतके आहे.
तर दुसरीकडे मोटो जी ५ एस प्लस या मॉडेलमध्ये तुलनेत सरस फिचर्स आहेत. यातील फुल एचडी डिस्प्ले हा ५.७ इंच आकारमानाचा असून यावरदेखील कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. यातील ऑक्टो-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ हा प्रोसेसरदेखील अधिक गतीमान आहे. याची रॅम ३/४ जीबी असून स्टोअरेजसाठी ३२/६४ जीबी असे दोन पर्याय असतील. तर मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. याच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे असून याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा घेता येतील. याशिवाय याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोटो जी ५ प्लस या मॉडेलमध्ये ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यातही रॅपीड चार्जींगसह ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. यात कनेक्टिव्हिटीमध्ये वरील सर्व पर्यायांसोबत एनएफसी हे अतिरिक्त फिचर देण्यात आले आहे. याचे जागतिक बाजारपेठेतील मूल्य २९९ युरो म्हणजेच सुमारे २५,३०० रूपये इतके आहे.
मोटो जी ५ एस आणि मोटो जी५ एस प्लस हे दोन्ही मॉडेल्स पहिल्यांदा अमेरिका व युरोपमध्ये लाँच करण्यात येत आहेत. तर भारतातही हे मॉडेल्स लवकरच सादर करण्यात येतील असे मानले जात आहे.