गुगल सर्चमध्ये कोणालाही दिसू शकतो तुमचा व्हॉट्सॲप नंबर; युजर्ससाठी धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 06:38 AM2021-01-26T06:38:54+5:302021-01-26T06:39:13+5:30
आधीच व्यक्तिगतता सुरक्षा धोरणातील प्रस्तावित बदलांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या व्हॉट्सॲपच्या अडचणींत भर पडली आहे...
कोरोनामुळे बुहतेकांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन राहण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यातही ऑफिसची बहुतांश कामे व्हॉट्सॲपवरच होऊ लागली आहेत. त्यामुळे घरी असाल तर लॅपटॉपवर किंवा मग ऑफिसात असाल तर डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप वेब जॉइन करून सर्व कामे सुरू असतात. मात्र, यातून आता एक धोका लक्षात आला आहे आणि तो म्हणजे या असल्या प्रकारामुळे गुगल सर्चवर तुमचा नंबर कोणालाही सहज दिसू शकतो. त्यामुळे आधीच व्यक्तिगतता सुरक्षा धोरणातील प्रस्तावित बदलांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या व्हॉट्सॲपच्या अडचणींत भर पडली आहे...
ग्रुप चॅटवरही घडला होता प्रकार
अगदी काही दिवसांपूर्वी असाच मोबाइल नंबर्सना पाय फुटण्याचा प्रकार ग्रुप चॅटवर घडला होता ग्रुप चॅटवरील नंबरचा वापर करून तो गुगलवर सर्च करत सहजपणे कोणीही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शिरकाव करू शकत होता. त्यामुळे व्हॉट्सॲपवर टीकेची झोड उठली होती. चूक लक्षात येताच व्हॉट्सॲपने या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे आश्वासन वापरकर्त्यांना दिले. मात्र, ग्रुप चॅट लिंक्स हटविण्याचे निर्देश व्हॉट्सॲपने गुगलला दिले असले तरी व्हॉट्सॲप वेब ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मोबाइल नंबर्स आता गुगल सर्च इंडेक्सवर दिसू लागले आहेत.
तेथूनच व्हॉट्सॲपवरील नंबर गुगलकडे जाण्यास सुरुवात होते. वैयक्तिक वापरकर्त्यांचे मोबाइल नंबर अधिक प्रमाणात दिसतात. अनेक जण ऑफिसचे काम करण्यासाठी व्हॉट्सॲप वेबचा वापर करत असल्याने हे धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे