अॅपल कंपनीच्या पहिल्या कम्प्युटरचा लिलाव, जाणून घ्या किती मिळाली किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 02:40 PM2018-09-26T14:40:34+5:302018-09-26T14:41:44+5:30
अमेरिकन टेक कंपनी अॅपलचा आज सगळीकडेच बोलबाला आहे. या कंपनीने तयार केलेला पहिला कम्युटर 'अॅपल - 1' मंगळवारी लिलावात विकला गेला.
अमेरिकन टेक कंपनी अॅपलचा आज सगळीकडेच बोलबाला आहे. या कंपनीने तयार केलेला पहिला कम्युटर 'अॅपल - 1' मंगळवारी लिलावात विकला गेला. RR Auction कडून बॉस्टनमध्ये या कम्प्युटरचा लिलाव करण्यात आला. असे म्हणतात की, हा कम्प्युटर तयार करण्यासाठी स्टीव्ह जॉब्स यांना त्यांची कार विकावी लागली होती.
अमेरिकेतील एका उद्योगपतीने हा कम्प्युटर 3,75,00 डॉलर म्हणजेच २ कोटी ७२ लाख रुपयांना खरेदी केलाय. पण या व्यक्तीच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही.
अॅपल- 1 ला अॅपलचे को-फाऊंडर स्टीव्ह वोजनियाक यांनी डिझाइन केलं होतं. त्यामुळेच या कम्प्युटरला Woz नावानेही ओळखलं जातं. हा कम्प्युटर १९७६ मध्ये तयार करण्यात आला होता. त्यावेळी याची किंमत 666.66 डॉलर इतकी होती, आजच्या हिशोबाने ही किंमत ४६ हजार रुपये आहे. अॅपल 1 तयार करुन ४० वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय. पण अजूनही हा कम्प्युटर तसाच काम करतो जसा १९७६ मध्ये करत होता.
या कम्प्युटरच्या लिलावाआधी अॅपलचे एक्सपर्ट कोरे कोहेन यांनी सांगितले की, स्टीव्ह जॉब्स यांनी तयार केलेला हा कम्प्युटर आजही काम करतो आणि याचे सर्वच पार्ट्स ओरिजिनल आहेत. टेस्टींग करताना हा कम्प्युटर ८ तास चालवून बघण्यात आला. यात कोणतीही अडचण आली नाही.
अॅपल-1 तयार करण्यासाठी येणारा खर्च स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोजनियाक हे करु शकत नव्हते. या कारणाने जॉब्स यांनी आपली व्हॅन आणि वोजनियाक यांनी आपला HP-65 कॅलक्यूलेटर विकला होता.
सुरुवातीला या कम्प्युटरचे २०० यूनिट तयार करण्यात आले होते आणि हा असा कम्प्युटर होता ज्यात कि-बोर्ड नव्हता. तसेच स्क्रीनही नव्हती. हा केवळ एक मदरबोर्ड होता, जो टीव्ही सेटसोबत कनेक्ट केला जाऊ शकत होता.
वोजनियाक यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, या कम्प्युटरची किंमत आम्ही 666.66 डॉलर ठेवली होती आणि या आमच्या पहिल्याच प्रॉडक्टच्या माध्यमातून आम्ही १२ हजार डॉलरची कमाई केली होती.
अॅपल - १ चा लिलाव डिसेंबर २०१४ मध्ये न्यूयॉर्कमध्ये गेला गेला होता. त्यावेळी अॅपल - 1 ला 36.5 लाख डॉलर (२२ कोटी रुपये) मध्ये अमेरिकेतील एका व्यक्तीने खरेदी केले होते. हा कम्प्युटर लिलावात जगातल्या ५० दुर्मिळ कम्प्युटरच्या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले होते.