अॅपलने लाँच केली वेगवान iOS 12; जाणून घ्या काय आहे वेगळेपण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 04:10 PM2018-09-19T16:10:52+5:302018-09-19T16:11:39+5:30
नवीन ओएस सुरु होण्यासाठी 40 टक्के, कॅमेरा सुरु करण्यासाठी 70 टक्के, कीबोर्ड सुरु होण्यासाठी 50 टक्के वेगवान असणार आहे.
अॅपलने सोमवारी रात्री iPhone आणि iPad साठी नवीन ऑपरेटिंग सिस्टिम iOS 12 लाँच केली आहे. आयफोनधारक वाय-फायद्वारे अपडेच करू शकणार आहेत. कंपनीने दावा केला आहे की, नवीन ओएस सुरु होण्यासाठी 40 टक्के, कॅमेरा सुरु करण्यासाठी 70 टक्के, कीबोर्ड सुरु होण्यासाठी 50 टक्के वेगवान असणार आहे. याशिवाय जाणून घ्या काय नवे फिचर्स कंपनीने दिले आहेत.
आयफोनवर नवीन आयओएस इन्स्टॉल केली की काही फिचर्स अशी आहेत जी कधीही पाहिलेली नाहीत. नवीन आयओएस केवळ 5 सी पासून पुढील मोबाईल आणि 2013 पासूनच्या आयपॅडवर उपलब्ध होणार आहे.
1. स्क्रीन डिटॉक्स
टच स्क्रीन असलेल्या मोबाईलची आपल्याला खूप सवय लागली आहे. आयओएस 12 मध्ये आता सारखी वापरण्यात येणारी अॅप दिसू शकणार आहेत. तसेच सेटिंगमध्ये स्क्रीन टाईम, काही अॅपना लिमिट सेट करता येणार आहे. तसेच डीएनडी ची सुविधाही देण्यात येणार आहे.
2. मेमोजी
आयओएस 12 मध्ये अॅनिमोजी फिचर वाढविण्यात येणार आहे. तसेच तुमच्या चेहऱ्याचेही इमोजी बनविण्यात येऊ शकणार आहे. म्हणजेच वापरकर्त्यांना त्यांच्या चेहऱ्याचे व्यंगचित्र बनवून त्यात आवाज रेकॉर्ड करून ते नंतर इमोजी म्हणून वापरता येणार आहे. हे अॅनिमेशन इमोजी आयमॅसेजद्वारे किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावर पाठविता येणार आहे.
3. वस्तूचे मोजमाप
नव्या आयओएस मध्ये कॅमेऱ्याचा वापर करून एखाद्या टेबल किंवा वस्तूचे मोजमाप घेता येणार आहे. सध्याच्या आयफोनमध्ये वास्तविकता दाखविण्याचे फिचर आहे. त्याचा वापर करून मोजमाप घेता येईल. यासाठी मेजर नावाचे अॅप देण्यात आलेले आहे.
4. एआर
ARKit 2 च्या मदतीने वापरकर्ते एआर गेम आणि एआर अॅप वापरू शकणार आहेत. म्हणजेच दोन आयफोनधारकांना एखादा गेम खेळायचा असेल तर ते सारख्याच ठिकाणी खेळू शकतात. त्यांच्या स्क्रीनवर सारखेच दृष्य दिसणार आहे.
5. ग्रुप व्हिडिओ कॉल
या फिचरमुळे एक दोघांशी नाही तब्बल 32 जणांशी व्हिडिओ कॉल करता येणार आहे. याचबरोबर अॅनिमोजी आणि मेमोजीही वापरता येणार आहेत.