Apple नं अजिबात नोकर कपात केली नाही, Meta-Google सारख्या बड्या कंपन्यांपेक्षा वेगळं काय केलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 07:31 PM2023-03-15T19:31:44+5:302023-03-15T19:33:21+5:30
जगातील सर्वात मोठ्या पाच टेक कंपन्यांपैकी Apple कंपनी वगळता गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉननं मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली.
जगातील सर्वात मोठ्या पाच टेक कंपन्यांपैकी Apple कंपनी वगळता गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉननं मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली. कंपनीला होणारा तोटा कमी करण्यासाठी या कंपन्यांनी नोकर कपातीचा मार्ग निवडला. Apple कंपनीलाही आर्थिक तोट्याची झळ बसली पण कंपनीनं कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं नाही. कर्मचाऱ्यांची नोकरी वाचवून कंपनीनं नेमका अडचणीतून कसा मार्ग काढला हे जाणून घेऊयात.
Apple कंपनीनं कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याऐवजी त्यांना मिळणारा बोनस कमी केला. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी आणखी काही आवश्यक पावलं उचलली गेली. तसंच नवी भरती देखील कमी केली गेली. याशिवाय बोनस देण्याच्या वेळेतही बदल केला गेला.
आता एकदाच बोनस
कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोनवेळा बोनस दिला जात होता. आता यात बदल करुन एकदाच बोनस दिला जाऊ लागला. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये यासंदर्भातील दावा करण्यात आला आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा प्रवास खर्च देखील कंपनीनं कमी केला आहे.
बदलांचा परिणाम
आता Apple कंपनी ऑक्टोबरमध्येच बोनस देईल. यापूर्वी एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये बोनस दिला जात होता. या बदलांमुळे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आणि सर्व्हीसवर परिणाम झाला आहे. ऑपरेशन, कॉर्पोरेट रिटेल आणि इतर गटातील कर्मचारी जुन्या योजनेचे पालन करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. Apple काही कॉर्पोरेट विभागांसाठी बोनस देण्यास विलंब करत आहे आणि खर्च कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
थर्ड-पार्टी कंत्राट बंद केलं
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅपलने खर्च कमी करण्यासाठी थर्ड-पार्टी कॉन्ट्रॅक्टर्सना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली आहे. कामावरून काढलेल्या कंत्राटदार कर्मचाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला Apple सीईओ टिम कुक यांनी कंपनीतील नोकर कपातीला शेवटचा पर्याय असं म्हटलं आहे.