टॅबलेट विक्रीतही अॅपल अव्वल; आयपॅडची आघाडी कायम
By शेखर पाटील | Published: August 4, 2017 02:20 PM2017-08-04T14:20:26+5:302017-08-04T14:20:39+5:30
गेल्या काही वर्षांपासून विक्रीत फारशी वाढ न होणार्या आयपॅडची जादू कायम असून आणि अर्थानच टॅबलेट विक्रीतही अॅपलची घोडदौड सुरू असल्याचे ताज्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून विक्रीत फारशी वाढ न होणार्या आयपॅडची जादू कायम असून आणि अर्थानच टॅबलेट विक्रीतही अॅपलची घोडदौड सुरू असल्याचे ताज्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
अॅपल कंपनीने आपल्या दुसर्या तिमाहीतील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. यात आयफोनच्या विक्रीचा चढता आलेख कायम असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. यासोबत आयफोनला दहा वर्षे झाली असल्याचे औचित्य साधून अॅपलने पहिल्यांदा दशकाचा आढावा प्रस्तुत केला आहे. यात आजवर जगभरात १२० कोटी आयफोन विकले गेल्याचे जाहीर झाले आहे. यातील ४.१ कोटी आयफोन हे गेल्या तिमाहीत विकले गेले आहेत हे विशेष. तर गत तिमाहीत १.१४ कोटी आयपॅड विकले गेले आहेत. गेल्या वर्षाच्या तिमाहितील आकडेवारीपेक्षा हा आकडा तब्बल १५ टक्क्यांनी जास्त आहे. अॅपलची घोडदौड ही तशी अपेक्षित बाब असली तरी आयपॅड या टॅबलेट मॉडेलच्या विक्रीतील उसळी ही अनपेक्षीत आणि अर्थातच कंपनीला नवीन उभारी देणारी ठरली आहे.
अॅपलच्या इतिहासाच आयपॅड या टॅबलेट मॉडेलला अनन्यसाधारण महत्व आहे. या टॅब्लेटने गुणवत्तेचा एक मापदंड प्रस्थापित केला असून अॅपलच्या अलीकडच्या कालखंडात तुफान लोकप्रिय झालेल्या आयमॅक, आयपॉड आणि आयफोन या प्रॉडक्टप्रमाणे हे मॉडेलही आयकॉनिक ठरले आहे. मात्र गत काही वर्षात आयपॅड टॅबलेट मॉडेलच्या विक्रीची गती मंदावली होती. यामागे प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जात होती. एक तर सॅमसंग आणि मायक्रोसॉफ्टसारख्या मातब्बर कंपन्यांच्या फ्लॅगशीप मॉडेल्ससोबत काही चिनी कंपन्यांनी किफायतशीर दरात सरस फिचर्सयुक्त टॅब्लेट सादर केल्यामुळे आयपॅडला मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाल्याचे मानले जात होते. तर दुसरीकडे स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे संगणकासह टॅब्लेटच्या विक्रीवरही विपरीत परिणाम झाल्याचा हा परिणाम मानला गेला होता. तथापि, या तिमाहितल्या कामगिरीमुळे आयपॅड मॉडेलची जादू कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे. येत्या काही दिवसांमध्येच नवीन आयफोनसह आयपॅडचे नवीन मॉडेल लाँच करण्यात येणार आहे. या नवीन मॉडेलमध्ये नेमके कोणते फिचर्स असतील? याबाबत आता उत्सुकतेचे वातावरण निर्मित झाले आहे.