Apple च्या iPhone वर या देशात येऊ शकते बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 05:21 PM2018-12-21T17:21:52+5:302018-12-21T17:22:52+5:30
अॅपलचे आयफोनवापरकर्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नियामक संस्था ट्रायने अॅप टाकण्याचे सांगितलेले असताना अॅपलने यास नकार दिला आहे.
नवी दिल्ली : अॅपलचे आयफोनवापरकर्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नियामक संस्था ट्रायने अॅप टाकण्याचे सांगितलेले असताना अॅपलने यास नकार दिला आहे. यामुळे ट्रायने भारतात अॅपलच्या विक्रीवर बंदी आणण्याचा इशारा दिला असतानाच अॅपलच्या फोनवर आणखी एका देशामध्ये बंदी येण्याची शक्यता आहे.
अॅपलवर कराराचा भंग केल्याचा आरोप क्वालकॉम या चीनच्या चिपसेट, प्रोसेसर बनविणाऱ्या कंपनीने ठेवला होता. याविरोधात दाखल केलेल्या खटल्याचा निकाल क्वालकॉमच्या बाजुने लागला असून जर्मनीतील म्युनिचच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यामुळे जर्मनीमध्ये आयफोनच्या विक्रीवर बंदी येईल. मात्र, अॅपल या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देऊ शकणार आहे.
क्वालकॉमने दोन पेटंटवरील खटले जिंकले आहेत. बंदी आल्यास आयफोन 7, प्लस, आयफोन 8, 8 प्लस आणि आयफोन एक्स हे फोन बंद होऊ शकतात. बंदी तेव्हाच लागू होऊ शकेल जेव्हा क्वालकॉम 668.4 युरो म्हणजेच 754 दशलक्ष डॉलरची अनामत रक्कम जमा करेल. ही रक्कम अॅपलला महसूल तूट भरपाई म्हणून देण्यात येईल.
यामुळे जरी क्वालकॉम जिंकले असले तरीही आयफोनची विक्री बंद करण्यासाठी त्यांना भलीमोठी रक्कम मोजावी लागणार आहे. यापूर्वीही चीनच्या न्यायालयात अॅपलविरोधात क्वालकॉमने एक खटला जिंकला आहे. चीनमधील बंदी टाळण्यासाठी अॅपलने त्यांच्या आयफोनच्या सॉफ्टवेअरमध्ये किंचित बदल करून विक्री सुरु ठेवली आहे. यावरही न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप क्वालकॉमने केला आहे.