11 मेपासून मिळणार अॅपलचे स्मार्टवॉच
By शेखर पाटील | Published: May 7, 2018 01:11 PM2018-05-07T13:11:12+5:302018-05-07T13:11:12+5:30
अॅपल कंपनीचे अॅपल वॉच सेरीज ३ हे मोबाईल सीमकार्डयुक्त स्मार्टवॉच भारतात ११ मे पासून उपलब्ध होणार असून याची सध्या जिओ व एयरटेलतर्फे अगावू नोंदणी सुरू आहे.
अॅपल कंपनीचे अॅपल वॉच सेरीज ३ हे मोबाइल सीमकार्डयुक्त स्मार्टवॉच भारतात ११ मे पासून उपलब्ध होणार असून याची सध्या जिओ व एयरटेलतर्फे अगावू नोंदणी सुरू आहे. अॅपल वॉच सेरीज ३ या मालिकेतील स्मार्टवॉच आधीच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. तथापि, यात सेल्युलर कनेक्टीव्हिटी असणारे व्हेरियंट अद्याप भारतात लाँच करण्यात आलेले नव्हते. आता मात्र जिओ आणि एटरटेल कंपन्यांसोबत करार करून अॅपलने आपले हे मॉडेल भारतात लाँच केले आहे. सध्या याची दोन्ही कंपन्यांच्या संकेतस्थळावरून नोंदणी सुरू असून प्रत्यक्षात ग्राहकांना हे मॉडेल ११ मे पासून मिळणार आहे. अॅपल वॉच सेरीज ३ या स्मार्टवॉचचे जीपीएस+सेल्युलर ३८ मिलीमीटर आकारमानाचा मॉडेल ३९,०८० रूपयात मिळणार आहे. तर गुलाबी रंगाचा पट्टा हवा असल्यास याचे मूल्य ३९,११२ रूपये असेल. तर ४२ मिलीमीटर आकाराचे स्मार्टवॉच ४१,१२० रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच अॅपल वॉच सेरीज ३ नाईके+जीपीएस+सेल्युलर या प्रकारातील ३८ मिलीमीटरचे मॉडेल ३९,१३० तर ४२ मिलीमीटरचे मॉडेल ४१,१८० रूपयात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
अॅपल वॉच सेरीज ३ च्या सेल्युलर आवृत्तीत अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील लक्षवेधी बाब म्हणजे या घड्याळातून हृदयाच्या ठोक्यांची माहिती डिस्प्लेवर सातत्याने मिळत असते. यात दिवसभरात या ठोक्यांमध्ये होणारे बदलदेखील दर्शविण्यात आलेले असतील. याच्या सविस्तर विश्लेषणासाठी स्वतंत्र हार्ट रेट पेजदेखील देण्यात येणार आहे. हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ आहे. यामुळे कुणीही अगदी पोहतांनाही याचा वापर करू शकतो. यात ई सीमकार्डचा वापर करता येणार आहे. अर्थात युजर आपल्या मोबाईल क्रमांकावरच याचा वापर करू शकतो. म्हणजेच यासाठी स्वतंत्र सीमकार्ड घ्यायची आवश्यकता नाही. या स्मार्टवॉचवर युजरचे कॉल, नोटिफिकेशन्स आदी मिळवता येणार आहे. यात फाइंड माय फ्रेंड हे विशेष फिचर आहे. यात अॅपल म्युझिक सेवेवरून कुणीही संगीताचा आनंद घेऊ शकणार आहे. यासाठी यात स्ट्रीमिंगची सुविधा देण्यात आली आहे. यात ड्युअल कोअर प्रोसेसर देण्यात आला असून तो आधीपेक्षा ७० टक्के गतीमान असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर अॅपल वॉच सेरीज ३ या मॉडेलमध्ये पहिल्यांदाच सिरी हा व्हाईस कमांडवर चालणारा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट देण्यात आला आहे. अर्थात हे स्मार्टवॉच ध्वनी आज्ञावलीवर चालू शकणार आहे. यात डब्ल्यू२ ही कस्टम चीप इनबिल्ट अवस्थेत देण्यात आली आहे. याच्या मदतीने ब्ल्यु-टुथ आणि वाय-फाय परिणामकारकतेने वापरता येणार आहे. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर पूर्ण दिवसभर चालणार असल्याचा कंपनीने दावा केला आहे. हे मॉडेल स्मार्टवॉच ओएस ४.० वर चालणार आहे.