अॅक्वा जाझ : जाणून घ्या सर्व फिचर्स
By शेखर पाटील | Published: December 13, 2017 10:33 PM2017-12-13T22:33:18+5:302017-12-13T22:33:41+5:30
अॅक्वा मोबाईल्स या कंपनीने आपल्या जाझ या ड्युअल कॅमेरायुक्त स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत ५,९९९ रुपये मूल्यात उतरण्याची घोषणा केली आहे.
अॅक्वा मोबाईल्स या कंपनीने आपल्या जाझ या ड्युअल कॅमेरायुक्त स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत ५,९९९ रुपये मूल्यात उतरण्याची घोषणा केली आहे. अॅक्वा मोबाईल्स या कंपनीने जाझ मॉडेलच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेतील किफायतशीर मूल्याच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.
अर्थात अत्यंत किफायतशीर मूल्यात या कंपनीने ड्युअल कॅमेरा सेटअप असणारे मॉडेल लाँच करून लक्ष वेधून घेतले आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि ०.३ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. या दोन्हींच्या एकत्रित परिणामातून अतिशय दर्जेदार आणि जीवंत वाटणारे फोटोग्राफ घेता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी अॅक्वा जाझ या मॉडेलमध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे.
अॅक्वा जाझ स्मार्टफोनमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा आयपीएस या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. तर यातील प्रोसेसर क्वॉड-कोअर या प्रकारातील असेल. या स्मार्टफोनची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यात २८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असेल.
यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-यूएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हिटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. अॅक्वा जाझ हा स्मार्टफोन ग्राहकांना ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.