कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल
By शेखर पाटील | Published: August 23, 2018 11:29 AM2018-08-23T11:29:37+5:302018-08-23T11:30:22+5:30
ओप्पो कंपनीने आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त असणारा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
ओप्पो कंपनीने आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त असणारा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
ओप्पो ए ५ हा स्मार्टफोन आधी चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हेच मॉडेल भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. याची खासियत म्हणजे यात आर्टीफिशियल इंटिलेजीयन्सयुक्त कॅमेर्यांचा समावेश करण्यात आला आहे. ओप्पोने या आधीदेखील अनेक सेल्फी स्पेशल कॅमेर्यांनी युक्त मॉडेल्स सादर केले आहेत. ओप्पो ए ५ या मॉडेलमध्येही अतिशय दर्जेदार फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. खरं तर मेगापिक्सल्सच्याबाबत विचार केला असता यापेक्षा अनेक सरस मॉडेल्स उपलब्ध आहेत. तथापि, या कॅमेर्यामध्ये एआय ब्युटी टेक्नॉलॉजी २.० या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने तब्बल २९६ फेशियल पॉइंटस् ओळखण्याची क्षमता याला प्रदान करण्यात आली आहे. यामुळे यातून अतिशय दर्जेदार सेल्फी प्रतिमा घेता येणार असल्याचे ओप्पो कंपनीने नमूद केले आहे. तर याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या अंतर्गत एफ/२.२ अपर्चरयुक्त १३ मेगापिक्सल्सचा तर एफ/२.४ अपर्चरयुक्त २ मेगापिक्सल्सचे कॅमेरे दिलेले आहेत. यातून अगदी सजीव वाटणार्या प्रतिमा घेता येणार आहेत. यामध्ये ४,२३० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली असून ती तब्बल १४ तासांचा व्हिडीओ बॅकअप देणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ वर आधारित कलरओएस ५.१ या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा आहे.
ओप्पो ए ५ या स्मार्टफोनमध्ये ६.२ इंच आकारमानाचा नॉचयुक्त एलसीडी डिस्प्ले दिलेला आहे. हा डिस्प्ले एचडी प्लस अर्थात १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण असणार आहे. तसेच याचा अस्पेक्ट रेशो १९:९ असा असेल. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४५० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. या मॉडेलचे मूल्य १४,९९० रूपये असून देशभरातील शॉपीजमधून याला उपलब्ध करण्यात येणार आहे.