धक्कादायक! ‘मेटाव्हर्स’मध्ये प्रवेश करताच अवघ्या ६० सेकंदानंतर महिलेवर गँगरेप, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 04:45 PM2022-02-02T16:45:11+5:302022-02-02T16:45:37+5:30
मेटाव्हर्समध्ये महिला अवतारासोबत काही पुरुष अवतारांनी सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महिलांवरील होणारे अत्याचार, बलात्कार यासारख्या बातम्या आपण नेहमी वाचतो. समाजातील काही विकृत लोकांमुळे महिलांवर बलात्काराचे प्रमाण कमी होण्याची चिन्हं नाहीत. त्यातच आता आधुनिक तंत्रज्ञानातही याचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. फेसबुकच्या मेटाव्हर्स या आभासी जगात आलेल्या कटू अनुभवाबद्दल एका महिलेने जाहीररित्या भाष्य केले आहे जे अनेकांसाठी चिंताजनक आहे.
मेटाव्हर्स या आभासी दुनियेत या महिलेवर गँगरेप झाल्याचं अनुभवायला मिळालं. नीना जेन पटेल नावाच्या महिलेला हा धक्कादायक अनुभव आला. मेटाव्हर्समध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या ६० सेकंदात तिच्यासोबत जे काही घडलं ते भयानक होतं. या ४३ वर्षीय महिलेने सांगितले की, काही ३-४ पुरुष अवतार मोठ्या आवाजासह शाब्दिक आणि लैंगिक छळ सुरु केला. या पुरुष अवतारांनी माझ्या महिला अवतारासोबत गँगरेप करुन त्याचे फोटोही काढल्याचं तिने सांगितले.
मेटाव्हर्समध्ये महिला अवतारासोबत काही पुरुष अवतारांनी सामुहिक बलात्कार केला. काहींनी याचे फोटो काढले आणि संदेश पाठवले तुला हे फोटो आवडत नसल्याचं ढोंग करु नको असं सांगितले. फेसबुकच्या मेटाव्हर्समध्ये साईन केल्यानंतर एक आभासी जगात तुम्ही पोहचता त्याठिकाणी यूजर्सचा अवतार भेटतात, एकमेकांशी संवाद साधतात. या आभासी दुनियेत शहरं, देश, कॅफे यासारख्या स्थळांना भेटी देतात.
या महिलेने सांगितले की, माझ्यासोबत जो काही प्रकार घडला तो अत्यंत भयंकर होता. मी माझी सुरक्षा करण्याचा विचार करणार इतक्यात हे सगळं वेगाने घडलं. मी त्यामुळे हादरुन गेले. हे वास्तव होतं की एक वाईट स्वप्न असं तिने म्हटलं आहे. फेसबुकच्या मेटाव्हर्सच्या आभासी जगात लैंगिक शोषणाच्या तक्रारी येण्याचा हा पहिलाच प्रकार नाही तर याआधीही असेच घडले होतं. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात एक बीटा टेस्टरनं मेटाव्हर्समध्ये लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता.
या महिलेने डेली मेलला सांगितले की, हा प्रकार थांबवण्यासाठी मी इतकी धडपड करत होते तिने तातडीनं हेडफोन्स दूर केले. बऱ्याच लोकांनी यापुढे स्त्री अवताराची निवड करु नका असा सल्ला नीनाला दिला. नीना पटेल या लंडनमधील महिला काबुनी व्हेंचर्स या इमर्सिव टेक्नॉलॉजी फर्मसाठी मेटाव्हर्स रिसर्चच्या उपाध्यक्षा म्हणून काम करतात.
या घटनेबाबत मेटा प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नीना पटेल यांना जो काही अनुभव आला ते ऐकून आम्हाला खेद वाटतो. आभासी जगात प्रत्येकाला सकारात्मक अनुभव मिळावा आणि सहज सुरक्षा करणारी साधनं उपलब्ध व्हावी यासाठी तपास आणि कारवाई करण्यात आम्ही प्रयत्नशील आहे. मेटाव्हर्समधील काही तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही मार्ग शोधू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.