सावधान... #10YearChallenge स्वीकारताय?; तुम्ही मोठा धोका पत्करताय!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 02:49 PM2019-01-18T14:49:10+5:302019-01-18T14:56:51+5:30
#10YearChallenge इंटरनेट व सोशल मीडियावर जेव्हा आपण कोणताही फोटो अथवा व्हिडीओ अपलोड करतो, तेव्हा तो फोटो...
>> तन्मय दीक्षित, सायबर एक्सपर्ट
२०१९ चा सुरुवातीला इंटरनेटवर सगळीकडे #10YearChallenge दिसायला लागले आहे. यात २००९ आणि २०१९ ( आत्ताचा ) असे दोन्ही फोटो एकमेकांशेजारी लावले जातात आणि इंटरनेटवर सोशल मीडियावर #10YearChallenge हा हॅशटॅग वापरून अपलोड केले जात आहेत. या दोन फोटोंमुळे आपल्या जीवनात कशी प्रगती होत गेली, तसेच आपल्या जीवनामध्ये कसा बदल होत गेला हे लोकांच्या लक्षात येतं, जुने दिवसही आठवतात आणि 'चॅलेंज' पूर्ण केल्याचा त्यांना आनंद होत आहे. पण, हे चॅलेंज वरवर दिसतं तिथलं साधं-सोपं-सरळ नाही. त्यामुळे आपणही अशा प्रकारचे आव्हान स्वीकारत असाल, तर जरा थांबा. खालील मुद्द्यांचा विचार करा.
तंत्रज्ञान
१. इंटरनेट व सोशल मीडियावर जेव्हा आपण कोणताही फोटो अथवा व्हिडीओ अपलोड करतो, तेव्हा तो फोटो कोणत्या कॅमेरामधून काढला गेला आहे, कोणत्या लोकशनवरून काढला आहे अशा प्रकारची इतर महत्वाची माहितीसुद्धा त्या फोटोमधून मिळवता येते. प्रतिमा विश्लेषणामध्ये हे सहजपणे लक्षात येऊ शकते.
२. फेसबुकवर जर आपला फोटो कोणी अपलोड केला तर फेसबुकमधील कृत्रिम बुद्धिमत्तेनुसार (आर्टिफिशल इंटेलिजन्स) आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने प्रतिमा विश्लेषण करून आपल्याला अधिसूचना येते की तुमचा फोटो कोणत्या अकाउंटवरून अपलोड केला गेला आहे. तुम्हीच ती व्यक्ती असाल तर स्वतःला टॅग करा असे तुम्हाला सांगितले जाते. आपला पूर्वीचा फोटो आणि आताचा फोटो आपल्याच अकाउंटवरून अपलोड केला, तर फेसबुकच्या आपला जुना आणि नवा हे दोन्ही फोटो मिळतात. या माहितीवरून फेसबुक आपण पुढील दोन तीन वर्षांनी कसे दिसू ( चेहऱ्याची ठेवण) याचा अभ्यास तर नक्कीच करू शकते. इंटरनेटवर आज चेहरे ओळखण्याचे सॉफ्टवेअर अथवा दोन चेहऱ्यांपासून नवीन चेहरा तयार करणारे अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत.
काय करावे?
१. स्वतःची वैयक्तिक माहिती अपलोड करू नये .
२. सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट अपलोड करताना आपण त्याची प्रायव्हसी सेटिंग पाहणे आवश्यक आहे .
३. फोटो अपलोड करताना फोटोमधील मेटा डेटा काढून ती प्रतिमा सोशल मीडियावर अपलोड केली पाहिजे.
'हे' धोके लक्षात घ्या!
१. चेहऱ्यावरून जर तुम्ही तरुण किंवा वृद्ध आहात हे दिसत असेल तर तुमच्या वयानुसार तुम्हाला जाहिराती दाखविल्या जाऊ शकतात.
२. आपण आपल्या स्वतःच्या चेहऱ्याचे विविध प्रकारे हावभाव करत असतानाचे फोटो अथवा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केले असतील तर त्यात मोठा धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण इंटरनेटवर आज काही अशी काही सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत की तुम्हाला कोडिंग न करता, व्हिडीओमध्ये असलेला चेहरा न घेता, आपल्याला हवा असेल तो नवीन दुसरा खोटा चेहरा लावू शकतो आणि नवीन खोटा व्हिडीओ तयार करता येऊ शकतो.
३. बऱ्याचदा फेसबुक वापरणाऱ्यांना प्रायव्हेट अथवा 'ओन्ली मी' असलेला डेटा चोरीला गेल्याचे उदाहरणे समोर आलेली आहेत.
४. सोशल मीडियावर पटकन फोटो व्हायरल पण होऊ शकतो व त्याचा कोणी गैरवापर केला तर पटकन कळत पण नाही.