सावधान ! तुमच्या माेबाईलमधील अॅप वापरुन तुमची हाेऊ शकते फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 08:31 PM2019-02-15T20:31:18+5:302019-02-15T20:39:56+5:30
युपीआयच्या माध्यमातून अनेक व्यवहार केले जात आहेत. त्यामुळे आता सायबर हल्लेखाेरांचा माेर्चा अॅप्स वापरणाऱ्यांकडे वळाला आहे.
पुणे : सध्या ऑनलाईनचा जमाना असल्याने नागरिक विविध अॅप्सच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करतात. या अॅपच्या माध्यमातून व्यवहार करणे साेपे आणि जलद असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचा ओढा हे अॅप्स वापरण्याकडे असताे. युपीआयच्या माध्यमातून अनेक व्यवहार केले जात आहेत. त्यामुळे आता सायबर हल्लेखाेरांचा माेर्चा अॅप्स वापरणाऱ्यांकडे वळाला आहे. त्यामुळे रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) सायबर सिक्युरिटी सेलच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी फसवणूकीपासून वाचण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सध्या नागरिकांना AnyDesk नावाचे अॅप प्लेस्टाेअर किंवा अॅपस्टाेअर वरुन डाऊनलाेड करण्याबाबतचा मेसेज येत आहे. AnyDesk नावाचे अनेक अॅप आहेत. या खाेट्या अॅप्सच्या माध्यमातून तुमच्या माेबाईलचा ताबा घेतला जाऊ शकताे. हे अॅप डाऊनलाेड केल्यानंतर 9 अंकी क्रमांक नागरिकांच्या माेबाईलवर येताे. हा नंबर फसवणूक करणारे अॅप नागरिकांना मागते. हा क्रमांक टाकल्यानंतर नेहमीच्या अॅप्सप्रमाणे हे अॅप तुम्हाला काही परवानग्या मागते. त्या परवानग्या दिल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांना तुमच्या माेबाईलचा ताबा मिळत असून ते त्याद्वारे तुमच्या माेबाईलवर असलेल्या इतर अॅपच्या माध्यमातून व्यवहार करुन तुमची फसवणूक करु शकतात.
याप्रकारे नागरिकांची फसवणूक करण्यात येत असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरबीआयच्या सायबर सिक्युरिटी सेलकडून करण्यात आले आहे.