Android Q अँड्रॉइडचं नवं व्हर्जन
By अनिल भापकर | Published: March 15, 2019 12:57 PM2019-03-15T12:57:56+5:302019-03-16T13:37:13+5:30
गुगलला टेक्नोसॅव्ही पिढी कल्पवृक्ष असे म्हणते कारण गुगलकडे जे काही मागाल (अर्थात माहिती )ते तुम्हाला काही क्षणात गुगल देते. आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन सुविधा देण्यात गुगलचा हात कोणीच धरू शकत नाही.
(Image Credit : Android Community)
अनिल भापकर
गुगलला टेक्नोसॅव्ही पिढी कल्पवृक्ष असे म्हणते कारण गुगलकडे जे काही मागाल (अर्थात माहिती )ते तुम्हाला काही क्षणात गुगल देते. आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन सुविधा देण्यात गुगलचा हात कोणीच धरू शकत नाही. जेव्हापासून गुगलने अँड्रॉइडच्या माध्यमातून स्मार्टफोनमध्ये शिरकाव केला तेव्हापासून तर गुगल सर्वसामान्यांच्या सुद्धा ओळखीचे झाले आहे.आजघडीला स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइडला येऊन जवळपास दहा वर्षाहून अधिक काळ लोटला. या दरम्यान अँड्रॉइडचे अनेक व्हर्जन आली. अँड्रॉइडच्या प्रत्येक नवीन व्हर्जनमध्ये युझर्ससाठी काहीतरी नवीन फीचर्स असतात. त्यामुळे जगभरातील टेक्नोसॅव्ही लोकांमध्ये अँड्रॉइडचे पुढचे व्हर्जन कधी येणार आणि त्याचे नाव काय असणार याविषयी प्रचंड कुतूहल असते. आज जगभरातील बहुतांश स्मार्टफोन हे गुगलच्या अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. गूगल नेहमी अँड्रॉइडच्या व्हर्जन्सची नावं विविध डेझर्ट्सवरून ठेवत असतं उदा. कपकेक, डोनट, फ्रोयो(2.0), जिंजरब्रेड(2.3), हनीकोंब (3.0), आईसक्रीम सँडविच(4.0), जेली बीन(4.1), किटकॅट(4.4), लॉलीपॉप(5.0), मार्शमेलो(6.0), नुगट(7.0), ओरीओ(8.0) ,पाय (९.०)
आता नव व्हर्जन म्हणजेच अँड्रॉइड क्यू.
नुकतंच गुगलने डेव्हलपर्स साठी आपले अँड्रॉइड क्यू बीटा व्हर्जन उपलब्ध करून दिले आहे.तसं पाहिले तर मागील वर्षी आलेले अँड्रॉइड पाय अजूनपर्यंत बऱ्याच लोकांपर्यंत नीटसं पोहोचलेले देखील नाही. तरी देखील गुगलने अँड्रॉइडचे पुढील व्हर्जन अर्थात अँड्रॉइड क्यू चे बीटा व्हर्जन उपलब्ध केले आहे. सध्यातरी फक्त डेव्हलपर्स साठी अँड्रॉइड क्यू उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. जसे यापूर्वीचे अँड्रॉइड पाय अँड्रॉइड नऊ या नावाने देखील ओळखल्या जाते तसेच अँड्रॉइड क्यू अँड्रॉइड दहा या नावाने ओळखल्या जाईल. तरी सुद्धा अँड्रॉइड क्यू मधील क्यू म्हणजे नेमके काय याचा सस्पेन्स अजून कायम आहे. मात्र याचे नाव क्यू वरूनच असेल हे नक्की .सध्यातरी हे व्हर्जन फक्त पिक्सेल फोन्स साठीच उपलब्ध असेल.
काय असेल अँड्रॉइड क्यू मध्ये
गुगलच्या अँड्रॉइड क्यू मध्ये काय फीचर्स असतील या विषयी उत्सुकता आहे. मात्र प्राप्त माहितीनुसार यामध्ये प्रायव्हसी सिक्युरिटी बाबत अधिक काम करण्यात आले आहे. जसे कि आता तुमच्या स्मार्टफोन चे लोकेशन एखाद्या ऍप ला कळू द्यायचे कि नाही हे तुम्ही ठरू शकाल.
किंवा फक्त ते अॅप चालू असतानाच तुमचे लोकेशन त्यांना कळू शकेल असे हि यात असेल . तसेच तुमच्या स्मार्टफोनचा आयएमईआय नंबर,सिरीयल नंबर यासह तुमची वैयक्तिक माहिती सहज कुणाला उपलब्ध होणार नाही याचीही काळजी यात घेण्यात येणार आहे. तसेच तुमच्या स्मार्टफोन मधील फोटो ,व्हिडीओ तसेच अन्य फाईल्स चा अक्सेस एखाद्या ऍपला द्यायचा किंवा द्यायचा नाही हे ठरविण्याचा अधिकार देखील युझर्सला असणार आहे. अँड्रॉइड क्यू मध्ये फोल्डेबल फोनला सुद्धा सपोर्ट असणार आहे.त्यामुळे युझर्सला मोठ्या स्क्रीनचा फायदा घेता येणार आहे.यासह अजूनही अनेक फीचर्स यात असणार आहेत.
anil.bhapkar@lokmat.com