सावधान! ३० लाख स्मार्टफोन धोक्यात; नवा मालवेअर सापडला, काय काळजी घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 08:53 AM2022-07-18T08:53:41+5:302022-07-18T08:54:54+5:30
नवीन मालवेअर आपल्या फोनमधील माहिती चोरी करतोच त्यासोबत गंडाही घालतो. याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. काय काळजी घ्यावी? जाणून घ्या...
लोकमत न्यूज नेटवर्क: अँड्रॉइड फोन वापरकर्ते गुगल प्ले स्टोअरवरून हजारो ॲप्स डाऊनलोड करतात. पण काही वेळा या ॲप्मसध्ये काही मालवेअरही दडलेले असतात. सध्या गुगल प्ले स्टोअरवर एक 'ऑटोलायकोस' नावाचा मालवेअर सापडला असून, तो आपल्या फोनमधील माहिती चोरी करतोच त्यासोबत गंडाही घालतो. त्यामुळे याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.
सहा ॲप्सवर कारवाई
हा मालवेअर गुगल प्ले स्टोअरच्या आठ ॲप्सवर होता. गुगलने सहा ॲप्सवर कारवाई केली आहे. मात्र २ मालवेअर ॲप्स अजूनही सक्रिय आहेत. हे ८ ॲप्स ३० लाखांपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड झाले आहेत. याचा अर्थ, 'ऑटोलायकोस' मालवेअर ३० लाखांपेक्षा अधिक स्मार्टफोनमध्ये आहे.
मालवेअर म्हणजे काय?
मोबाइलमधील आपल्या ॲप्सच्या माध्यमातून काही बग्ज सोडले जातात. याचा वापर करून आपल्या फोनमधील माहिती चोरली जाते. हे सर्व आपल्या नकळतपणे होत असते. या माहितीचा गैरवापर अनेकजण विविध प्रकारे करू शकतात.
कसे गंडा घालते?
'ऑटोलायकोस' सुरक्षित लिंकवरून काम करते. यामुळे त्याच्यावर कुणाचेही लक्ष जात नाही. काही वेळा, या मालवेअर असलेल्या ॲप्सने एसएमएसद्वारे सिस्टममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. हा मालवेअर वापरकर्त्यांना त्यांच्या नकळत प्रीमियम सेवा पुरवतो. बँक खात्यातून थेट पैसे कापले जातात.
काय काळजी घ्याल?
- वापरकर्त्यांनी वरील ॲप्स त्यांच्या स्मार्टफोनमधून त्वरित काढून टाकावेत.
- आपल्या बॅकग्राउंड इंटरनेटचा वापर तपासा
- कोणते ॲप किती बॅटरी वापरते हेही लक्षात ठेवा
- गुगल प्ले स्टोअरवर प्ले प्रोटेक्ट मोड ॲक्टिव्ह ठेवा.
- शक्य तितके कमी ॲप्स डाउनलोड करा.