ओपन एआयमध्ये मोठा भूकंप! ChatGPT चा सर्वेसर्वा सॅम ऑल्टमनला नोकरीवरून काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 08:45 AM2023-11-18T08:45:24+5:302023-11-18T08:47:30+5:30
OpenAI चे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन हे बोर्डाचे अध्यक्षपद सोडणार आहेत. भारतीय वंशाच्या मीरा मुरत्ती या अंतरिम सीईओ असणार आहेत.
चॅटजीपीटीद्वारे अवघ्या जगाला ध़डकी भरविणाऱ्या कंपनीने सीईओ आणि सह संस्थापक सॅम ऑल्टमनला नोकरीवरून काढून टाकले आहे. ओपन एआयनुसार कंपनीला पुढे घेऊन जातील असा विश्वास ऑल्टमनवर नाहीय, यामुळे त्यांना बाजुला करण्यात आले आहे. भारतीय वंशाच्या मीरा मुरत्ती या अंतरिम सीईओ असणार आहेत.
ओपनएआयला मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपनीचा आसरा मिळाला आहे. गेल्यावर्षी चॅट जीपीटी लाँच झाले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. करो़डो नोकऱ्या जाण्याची भीती निर्माण झाली होती. ऑल्टमन बाहेर पडल्यानंतर, सीटीओ मीरा मुरत्ती या अंतरिम सीईओची भूमिका स्वीकारणार आहेत. कंपनी कायमस्वरूपी सीईओसाठी शोध सुरू ठेवणार आहे.
एवढेच नाही तर OpenAI चे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन हे बोर्डाचे अध्यक्षपद सोडणार आहेत. ओपन एआयमध्ये जेवढा काळ काम केले मला आनंद मिळाला, असे ट्विट ऑल्टमनने केले आहे. कंपनीत प्रतिभावान लोकांसोबत काम करताना मला सर्वाधिक आनंद झाला आहे, असे तो म्हणाला.
कंपनीच्या बोर्डाने खूप विचारविनिमय केल्यानंतर ऑल्टमन यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सॅम त्यांच्याशी चर्चा करताना स्पष्ट नव्हता. यामुळे बोर्डाला त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अडथळा आला. बोर्डाला आता ऑल्टमनच्या क्षमतेवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे, असे ओपन एआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ब्रॉकमन यांनीही ट्विट करत म्हटले की, आठ वर्षांपूर्वी माझ्या अपार्टमेंटमध्ये सुरुवात केल्यापासून आम्ही एकत्र जे निर्माण केले आहे त्याचा मला अभिमान आहे. आम्ही कठीण आणि आश्चर्यकारक काळात एकत्र राहिलो. आजच्या बातम्यांच्या आधारे मी पद सोडले आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो, असे ते म्हणाले.