भारीच! आता विजेचा खांब आणि बस स्टॉपवरून येणार 5G नेटवर्क; 'असा' आहे सरकारचा नवा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 01:57 PM2022-03-24T13:57:47+5:302022-03-24T14:00:22+5:30
TRAI And 5G : ट्रायने 5जी ला इन्स्टॉल करण्यासाठी विजेचे खांब आणि बस स्टॉपसारख्या स्ट्रीट फर्निचरच्या वापराविषयी लोकांकडून प्रतिक्रिया मागितली आहे.
नवी दिल्ली - सध्या 5G नेटवर्कची जोरदार चर्चा सुरू आहे. टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे (TRAI) ने 5G संबंधित अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. थेट विजेच्या खांब आणि बस स्टॉपच्या माध्यमातून प्रत्येक घरात 5जी नेटवर्क पोहचण्याची योजना आखली जात आहे. ट्रायने 5जी ला इन्स्टॉल करण्यासाठी विजेचे खांब आणि बस स्टॉपसारख्या स्ट्रीट फर्निचरच्या वापराविषयी लोकांकडून प्रतिक्रिया मागितली आहे.
ट्रायने म्हटले आहे की, सार्वजनिक स्ट्रीट फर्निचरचा उपयोग केल्याने नवीन व मोठ्या मोबाईल टॉवर्स आणि फायबरची गरज भासणार नाही. ट्रायने याबाबत मत मांडण्यासाठी 20 एप्रिल आणि काउंटर सल्ल्यासाठी 4 मे ही तारीख निश्चित केली आहे. देशातील ग्रामीण व दुर्गम भागात देखील सहज 5जी नेटवर्क पोहचवता येईल. रिपोर्टनुसार, स्ट्रीट फर्निचरचा वापर केल्यास छोट्या भागात 5जी नेटवर्क सहज उपलब्ध करता येईल. mmWave 5जी बँड पोहचवणे सहज शक्य होईल.
mmWave 5जी बँडच्या माध्यमातून सर्वात फास्ट 5जी नेटवर्क उपलब्ध होते. परंतु, याचे कव्हरेज कमी आहे. मोबाईल टॉवर्स आणि फायबरच्याऐवजी विजेच्या खांबांचा वापर केल्यास 5जी नेटवर्कला इन्स्टॉल करण्यासाठी कमी खर्च येईल. सोबतच 5जी नेटवर्क आणि सर्विस सुरू करण्यासाठी कमी वेळ लागेल. विजेच्या खांबाच्या माध्यमातून 5जी पोहचवण्याची टेक्नोलॉजी विकसित झाल्यास 5जी स्पीड देखील वाढेल. पुढील काही महिन्यात 5जी नेटवर्क भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.