खुशखबर! भारताला मोठं यश; स्मार्टफोनच्या किंमती कमी होणार; कारण जाणून वाटेल अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 03:59 PM2023-06-27T15:59:32+5:302023-06-27T16:00:05+5:30
भारतात अशा प्रकारची चीप तयार होण्याची ही पहिलीच वेळ असेल...!
भारतात गेल्या अनेक वर्षांपासून स्मार्टफोनची निर्मिती होते. एवढेच नाही, तर मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोन एक्सपोर्ट देखील केले जातात. मात्र, भारतात स्मार्टफोन तयार करताना काही अडचणीही येत होत्या. हे फोन तयार करण्यासाठी लागणारे पार्ट्स बाहेरून मागवावे लागत होते. परिणामी फोन तयार करण्यासाठी अधिक खर्च येत होता. मात्र आता भारताला एक मोठे यश मिळाले आहे. जे जाणून आपल्यालाही अभिमान वाटेल.
तयार होणार मेड इन इंडिया चिपसेट -
खरे तर, अमेरिकन कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर बनविण्याचे युनिट टाकत आहे. यासंदर्भात बोलताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आयटी आणि टेलीकॉम मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, मायक्रॉन पुढील 18 महिन्यांत भारतामध्ये चिपचे प्रोडक्शन सुरू करेल. एखाद्या कंपनीने भारतात अशा प्रकारची चीप तयार करण्याची ही पहिलीच वेळ असेल. साधारणपणे डिसेंबर 2024 मध्ये भारतात ही चीप तयार होण्याची शक्यता आहे.
असा होईल फायदा -
माध्यमांतील वृत्तांनुसार, ही चीप भारतात तयार झाल्यानंतर, मोबाईल, लॅपटॉप, सर्व्हर आदी काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तयार करण्यासाठी कमी खर्च येईल. यामुळे भारतात स्मार्टफोनची किंमत कमी होईल. याच बरोबर भारतातून जगातील इतर देशांत स्मार्टफोन एक्सपोर्ट करण्यात तेजी येईल. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल. याशिवाय देशात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्याही निर्माण होऊ शकतात.
युनिटसाठी एवढा खर्च अपेक्षित -
केंद्रीय मंत्र्यांच्या मते, या चिप युनिटसाठी 825 मिलियन डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे. हे प्रोडक्शन युनिट 5,00,000 स्क्वेअर फुटांत पसरलेले असेल. जे 2024 च्या अखेरीस सुरू होईल.