ट्विटरसाठी अब्जाधीश मस्कने शेअर्स विकले, कर्जही काढले; पहिल्याच दिवशी सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 06:15 AM2022-10-29T06:15:31+5:302022-10-29T07:16:52+5:30
मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल व कायदेशीर कार्यकारी विजया गड्डे यांच्यासह चार उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली.
न्यूयॉर्क : अब्जाधीश इलॉन मस्क यांनी ट्विटरचे तब्बल ४४ अब्ज डॉलर्सचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘पक्षी मुक्त झाला आहे,’ असे ट्वीट करीत आनंद व्यक्त केला. यासाठी त्यांनी टेस्लाचे काही शेअर्स १५.५ अब्ज डॉलर्सला विकले तर १३ अब्ज डॉलर्सचे कर्जही काढले. मात्र हा प्रसंग ट्विटरमधील वरिष्ठांसाठी दु:खाचा ठरला. मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल व कायदेशीर कार्यकारी विजया गड्डे यांच्यासह चार उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली.
जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीने गुरुवारी ट्विटर खरेदीचा करार पूर्ण केला, असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले असून, चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकत मस्क यांनी ट्विटरची साफसफाई सुरू केल्याचे त्यात म्हटले. अग्रवाल, गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल व सल्लागार सीन एजेट यांचा समावेश यांच्यावर तूर्तास मस्क यांची कुऱ्हाड कोसळली.
नेटकरीही दुभंगलेले
मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा करार बंद केल्याने आणि सोशल मीडिया फर्मच्या चार उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकल्याने, भारतात ट्विटरवर भारतीय वापरकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ट्विटरवरील मजकूर नियंत्रित करण्यास विरोध करणारे मस्क यांच्या आगमनाचे स्वागत करीत आहेत, तर उर्वरित सावध प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
अग्रवाल यांची कारकिर्द
ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर ३८ वर्षीय अग्रवाल यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ट्विटरचे सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. आयआयटी मुंबई आणि स्टॅनफोर्डचे माजी विद्यार्थी अग्रवाल एका दशकापूर्वी ट्विटरमध्ये नोकरीला लागले होते. तेव्हा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांची संख्या केवळ हजाराच्या घरात होती.