1,114 व्हॉट्सअॅप ग्रुपचा एकच अॅडमिन, जाणून घ्या कोण आहे 'तो'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 01:35 PM2019-04-11T13:35:06+5:302019-04-11T13:36:04+5:30
एक अशी व्यक्ती जी एक, दोन नव्हे, तर 1114 व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन आहे.
कोलकाता- एक अशी व्यक्ती जी एक, दोन नव्हे, तर 1114 व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन आहे. ऐकून धक्का बसला ना, पण हे खरंच आहे. भाजपा आयटी सेलचे पदाधिकारी दीपक दास हे 1,114 व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन आहेत. भाजपा रॅली, पक्ष कार्यालयातील बैठक, घरीसुद्धा दोन मोबाइल कायम त्यांच्या जवळच असतात. तसेच स्टँडबायसाठी एक बॅटरी चार्जरही ठेवलेला असतो.
दीपक हे भाजपाच्या आयटी सेलचे कुचबिहारमधले जिल्हा पदाधिकारी आहेत. ते 1 हजार 114 व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन आहेत. 36 वर्षीय दीपक भाजपाचं फेसबुक आणि ट्विटरचं पेजही सांभाळतात. दीपक सांगतात मी एकटाच नव्हे, तर अनेक कार्यकर्ते पक्षासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत. सोशल मीडियाही हे सध्या दुधारी अस्त्र आहे. तृणमूल काँग्रेसचं पश्चिम बंगालमध्ये असलेलं वर्चस्व आणि दहशतीमुळे भाजपाचा प्रचार करणं बरंच अवघड आहे. मी एका नंबरवर 229 व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन आहे. तर दुसऱ्या नंबरवरून 885 व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन आहे.
प्रत्येक ग्रुपमध्ये कमीत कमी 30 जण आणि जास्तीत जास्त 250 जण असतात. दरदिवशी संख्या बदलत असते. कारण काही जण ग्रुप सोडतात, तर काही जण अॅड केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून माझ्याकडे रिकामी असा वेळच नसतो. पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राइक केल्यानंतर आम्ही 24 तास काम केलं आहे. पक्षातर्फे प्रत्येकाच्या घराघरात जाऊन राष्ट्रीय ऑनलाइन सदस्यतेचं अभियान सुरू केलं होतं. मी 12वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. परंतु पुढे आर्थिक कारणास्तव शिकता आलेलं नाही. 2014मध्ये मोदींच्या प्रचारासाठी मी भाजपामध्ये सहभागी झालो. त्यानंतर मला ब्लॉक महासचिव बनवण्यात आलं. 2015ला मी अँड्राइड फोन विकत घेतला आणि प्रचाराला सुरुवात केली. या वर्षी पक्षानं 10 हजार रुपयांचा स्मार्टफोन आणि एक पोर्टेबल चार्जरही दिला आहे. तसेच पक्षाकडून माझ्या प्रवासाचाही खर्च केला जातो. दास यांनी कोलकाता भाजपाच्या आयटी सेलद्वारे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तसेच त्यांनी हावडामध्ये अमित शाहांच्या अध्यक्षतेखालील एका सत्रात भागही घेतला होता. तिथेच अमित शाहांनी त्यांना काय करायचं आहे आणि काय करायचं नाही, याचं बौद्धिक दिलं.