ब्लॅकबेरी की-२ : क्वार्टी कि-पॅडसह उत्तमोत्तम फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 10:12 AM2018-07-24T10:12:07+5:302018-07-24T10:12:26+5:30
टिसीएल कंपनीने अलीकडेच जाहीर केलेला आपला ब्लॅकबेरी की २ हा स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे.
टिसीएल कंपनीने अलीकडेच जाहीर केलेला आपला ब्लॅकबेरी की २ हा स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे.
सध्या टिसीएल या कंपनीकडे ब्लॅकबेरी ब्रँडची मालकी आहे. या कंपनीने गेल्या महिन्याच्या प्रारंभी ब्लॅकबेरी की २ हा स्मार्टफोन लाँच केला होता. फेबु्रवारी २०१७ मध्ये ब्लॅकबेरी किवन हे मॉडेल लाँच करण्यात आले होते. यानंतर सुमारे दीड वर्षानंतर याची दुसरी आवृत्ती सादर करण्यात आली आहे. यात आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक दर्जेदार फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये ब्लॅकबेरी कंपनीची खासियत असणारा क्वार्टी कि-बोर्ड प्रदान करण्यात आला आहे. तर याच्या वरील भागात असणार्या डिस्प्लेमध्ये टचस्क्रीनची सुविधा देण्यात आलेली आहे. अर्थात याला फिजीकल आणि टचस्क्रीन या दोन्ही प्रकारात वापरता येणार आहे.
ब्लॅकबेरी की २ या मॉडेलमध्ये ४.५ इंच आकारमानाचा आणि १६२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले असून याचा अस्पेक्ट रेशो ३:२ असा आहे. यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६६० हा प्रोसेसर आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते तब्बल २ टिबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. याच्या मागील बाजूस प्रत्येकी १२ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यातील एक कॅमेरा टेलीफोटो लेन्स या प्रकारातील असल्यामुळे युजरला ४ एक्स ऑप्टीकल झूमच्या क्षमतेने प्रतिमा काढता येतील. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी याच्या पुढील बाजूस ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यात ३,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. या स्मार्टफोनचे मूल्य ४२,९९० रूपये इतके असून याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून ३१ जुलैपासून खरेदी करता येणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट वा डेबीट कार्डवरून याला खरेदी करणार्या ग्राहकाला ५ टक्के रकमेचा कॅशबॅक मिळणार आहे.